Tuesday, February 6, 2018


राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे
अध्यक्ष अरुण देशपांडे यांचा दौरा
नांदेड, दि. 7 :- राज्य अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत कार्यरत राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष (मंत्रीस्तरीय) तथा राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार 8 फेब्रुवारी 2018 रोजी मुंबई येथुन रेल्वेने सकाळी 8 वा. नांदेड येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण आणि राखीव. सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अखिल भारतीय ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुरवठा संबंधी अधिकारी, शासकीय व अशासकीय सदस्य यांच्या समवेत ग्राहक संरक्षण या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक व चर्चा. दुपारी 3 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत पत्रकार परिषद. सायं 5 ते 7 वाजेपर्यंत नांदेड येथील पिपल्स कॉलेज येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यकर्त्यांसोबत बैठक व चर्चा. रात्री 8 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.
शुक्रवार 9 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 6 वा. वाहनाने परभणीकडे प्रयाण करतील.
000000


कर्करोग जनजागृती कार्यक्रमात
विविध आजारावर मार्गदर्शन
नांदेड, दि. 7 :- जागतिक कर्करोग दिन व पंधरवाडा 4 ते 16 फेब्रुवारी 2018 या कालावधीत जिल्ह्यात साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने श्री गुरुगोबिंद सिंघजी मेमोरियल हॉस्पिटल जिल्हा रुग्णालय नांदेड व यशवंत महाविद्यालय (एनएसएस विभाग) यांच्या सयुंक्त विद्यमाने  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा ढोकी येथे कर्करोग जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी जिल्हा रुग्णालयातील  जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक हजारी व जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे यांनी विद्यार्थ्यांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थापासून होणारे कर्करोग व इतर विविध आजाराबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी तंबाखू मुक्त जीवनासाठी मी तंबाखू खाणार नाही अशी शपथ घेतली. त्यात विद्यार्थ्यांसह गावातील नागरिकांचाही सहभाग होता.  
कार्यक्रमास एनएसएस विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवराज बोकडे, प्रा. डॉ. पतंगे, जिल्हा रुग्णालय येथील समुपदेशक सुवर्णकार सदाशिव, प्रकाश आहेर, सामाजिक कार्यकर्ता गायकवाड बालाजी, एनएसएसचे विद्यार्थी व गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
0000000

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान
कर्जमाफीचा आतापर्यंत ३१ लाख शेतकऱ्यांना लाभ

मुंबई, दि. 6: राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेंअंतर्गत आतापर्यंत ३१ लाख ३२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वितरित करण्यात आली असल्याची माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी दिली.
मंत्रालयात श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची आढावा बैठक संपन्न झाली.
या योजनेंतर्गत दाखल झालेल्या अर्जातील 47.73 लाख खात्यावर(Green List) कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभ मंजुर केला असून त्यासाठी सुमारे 23 हजार 102 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी 5 फेब्रुवारी अखेर 31.32 लाख कर्ज खात्यांवर लाभापोटी 12 हजार 362 कोटीची रक्कम वितरित करण्यात आली आहे. मंजूर करण्यात आलेल्या एकूण 47.73 लाख कर्ज खात्यांपैकी बँकांकडून काही खात्यावरील माहिती अद्ययावत करुन पुन:श्च पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.
योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची माहिती व बँक खात्यांची माहिती यांची पडताळणी केली असता जी कर्ज खाती योजनेच्या निकषात बसत नाहीत अशा एकूण 4.77 लाख (Yellow List)कर्ज खात्यांबाबतची माहिती पोर्टलद्वारे बँकांना पडताळणीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली होती. अशा कर्ज खात्यांची पडताळणी बँकांमार्फत करण्यात आली असून सुमारे १ लाख ७५ हजार खात्यांची तपासणी करुन फेर प्रक्रियेसाठी पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहेत.
योजनेमध्ये अर्ज दाखल केलेल्या ज्या शेतकऱ्यांची माहिती बँकेकडील माहितीशी जुळली नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यांच्या माहितीची शहानिशा करुन निर्णय घेण्यासाठी तालुकास्तरीय समित्या गठित करण्यात आल्या असून अशा तालुकास्तरीय समितीद्वारे निर्णय प्रक्रियेसाठी 21.69 लाख कर्जखाती (unmatch application data)ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. यापैकी बँकांनी काल दि. 5 फेब्रुवारी अखेर एकूण 5.65 लाख खात्यांची माहिती अपलोड केलेली आहे. या खात्यांबद्दलची नमुना १ ते ६६ मध्ये भरलेली माहिती बँकांनी पोर्टलवर पात्र/अपात्रतेसह नोंद करुन अपलोड करावयाची असून त्यानंतर अशा खात्यांबाबत मंजूर/नामंजूरीचे निर्णय घेऊन पोर्टलवर अपलोड करण्याची कार्यवाही तालुकास्तरीय समितीमार्फत चालू आहे. तसेच या योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या अथवा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी/गाऱ्हाणी ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची कार्यप्रणाली तयार करण्याचे काम चालू असल्याची माहिती श्री. देशमुख यांनी यावेळी दिली.
 देशातील सर्वात मोठी कर्जमाफी राज्य सरकारने केली मात्र त्याबाबत शंका उपस्थित होऊ नये यासाठी कर्जमाफीच्या अंमलबजावणीसंदर्भात शेतकऱ्यांना वेळोवेळी माहिती प्रसारमाध्यमांद्वारे देण्याच्या सूचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव एस.एस. संधू यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
००००


होमगार्डच्या 87 पुरुष, 181 महिला पदांसाठी
मोफत नाव नोंदणी 21 फेब्रुवारी पासून होणार   
नांदेड, दि. 6 :- जिल्ह्यातील नांदेड, बिलोली, हदगाव, मुखेड व देगलूर पथकातील 87 पुरुष व 181 महिला होमगार्ड पदांच्या जागांसाठी नाव नोंदणी 21 ते 23 फेब्रुवारी 2018 या कालावधीत पोलीस मुख्यालय कवायत मैदान नांदेड येथे मोफत करण्यात येणार आहे. जास्तीतजास्त नागरीकांनी या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी केले आहे. 
नांदेड पथकात- 23 पुरुष व 56 महिला, बिलोली- 12 पुरुष व 27 महिला, हदगाव- 28 पुरुष 25 महिला, मुखेड- 7 पुरुष 11 महिला, देगलूर-17 पुरुष 7 महिला, कंधार- 23 महिला, किनवट-21 महिला, भोकर- 11 महिला होमगार्डच्या रिक्त पदांसाठी ही नाव नोंदणी करण्यात येणार आहे. उमेदवारांसाठी वयोमर्यादा 20 ते 50 वर्षे असून किमान दहावी उत्तीर्ण असावा. पुरुष उमेदवारासांठी उंची 162 सें.मी किमान, छाती न फुगवता 76 सेंमी, आणि फुगवून 81 सेमी असवी. 1 हजार 600 मीटर धावणे व गोळाफेक या मैदानी चाचणी अनिवार्य आहे.
  महिला उमेदवारांसाठी उंची किमान 150 सेमी असावी. आठशे मीटर धावणे व गोळाफेक ही मैदानी चाचणी घेण्यात येईल. उमेदवारास या चाचणीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक प्रकारात कमीतकमी 40 टक्के गुण आवश्यक राहतील. या व्यतीरिक्त आटीआय प्रमाणपत्र, खेळाचे कमीतकमी जिल्हास्तरीय प्रमाणपत्र, माजी सैनिक प्रमाणपत्र, एनसीसीचे बी. किंवा सी प्रमाणपत्र नागरी स्वरक्षण सेवेत असल्याचे प्रमाणपत्र जडवाहन चालविण्याचा परवाना या प्रमाणपत्रधारकांना तांत्रीक अर्हता गुण दिल्या जातील.
पोलीस मुख्यालय कवायत मैदान नांदेड येथे बुधवार 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजेपासून नाव नोंदणी करण्यात येईल. सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत कागदपत्रांची तपासणी व शारिरीक चाचणी घेण्यात येईल. नाव नोंदणीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असल्याचे मुळ प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे तीन कलर फोटो, रहिवाशी असल्याचा सक्षम पुरावा, इतर शैक्षणिक कागदपत्रे झेरॉक्स प्रतीसह सोबत आणावीत. शारिरीक चाचणीत पात्र ठरलेल्या पुरुष उमेदवारांची मैदानी चाचणी 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वा. शहीद भगतसिंघ चौक असर्जन नाका विष्णुपुरी रोड नांदेड येथे घेण्यात येईल. शारिरीक चाचणीत पात्र ठरलेल्या महिला उमेदवारांची मैदानी चाचणी 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वा. शहीद भगतसिंघ चौक असर्जननाका विष्णुपुरी रोड नांदेड येथे घेण्यात येईल.
होमगार्ड ही निष्काम सेवा असलेले संघटन आहे. होमगार्ड स्वयंसेवकांना कुठलाही नियमीत पगार किंवा मानधन दिल्या जात नाही. कर्तव्य बजावल्यानंतरच कर्तव्य भत्ता दिला जातो. नाव नोंदणीसाठी आलेल्या कोणत्याही उमेदवाराला कुठलाही प्रवास भत्ता दिला जाणार नाही. शारिरीक किंवा मैदानी चाचणीच्यावेळी कोणताही अपघात घडल्यास किंवा शारिरीक दुखापत घडल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी ही संबंधीत उमेदवारांची राहील.
काही तांत्रिक अथवा अपरिहार्य कारणास्तव नाव नोंदणी प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार जिल्हा समादेशक यांना राहील. नाव नोंदणीसाठी पैशाची मागणी केल्यास लाचलूचपत प्रतिबंधक शाखा नांदेड यांचेकडे 02462-253312 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा‍, असे आवाहन जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी केले आहे.
000000


तालुकास्तरावर आठवड्याला
शेतकऱ्यांसाठी शिबीर
नांदेड, दि. 6 :- कृषि विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान यांत्रिकिकरण अभियान, प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना व इतर योजना राबविण्यात येत आहे. या योजना थेट लाभ हस्तांतरण तत्वावर कार्यरत असून या कार्यपद्धती नवीन असल्याने व कागदपत्राची पुर्तता न झाल्याने शेतकऱ्यास वेळेत लाभ मिळण्यासाठी अडचणी येतात. या अडचणी दूर करण्यासाठी तालुकास्तराव प्रत्येक आठवड्याला शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या आठवड्यात गुरुवार 8 फेब्रुवारी 2018 रोजी शिबिराचे आयोजन केले आहे.  पुढील आठवड्यापासून दर मंगळवारी शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी ज्यांचे काम पूर्ण आहे परंतू अनुदान भेटले नाही अशा लाभार्थींनी या दिवशी संपूर्ण कागदपत्रांसह तालुका कृषि अधिकारी कार्यालयात उपस्थित राहून कार्यवाही पूर्ण करुन द्यावी. तसेच या शिबिराला कृषि सहाय्यक ते तालुकास्तरावरील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार असून याचे समन्वय उपविभागीय कृषि अधिकारी करणार आहेत , असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

0000000
अतिरिक्त गुणाचे प्रस्ताव
स्विकारण्यास मुदतवाढ
नांदेड, दि. 6 :-  मार्च 2018 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या व शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याचे प्रस्ताव विद्यार्थ्यांनी शाळांकडे 10 फेब्रुवारी पर्यत तर माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे  20 फेब्रुवारी 2018 पर्यत सादर करावयाचे आहेत.
इयत्ता दहावीत प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व माध्यमिक शाळांनी याची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचीत कार्यवाही करावी. कोणताही विद्यार्थी या गुणांच्या सवलतीपासून वंचित राहणार नाही याची सर्व शाळाप्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.

000000
शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी,
निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वाटप
नांदेड, दि. 6 :- उच्च माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण जून 2017 च्या प्रशिक्षणास ज्या शिक्षकांनी प्रत्यक्ष प्रशिक्षण व प्रशिक्षण काळातील मुल्यमापन व प्रशिक्षणोत्तर काळातील गृहकार्य पूर्ण केलेले आहे, त्यांची प्रमाणपत्रे तयार करण्यात आलेली असून ती प्रमाणपत्रे शिक्षणाधिकारी (माध्य) नांदेड यांना वितरीत करण्यासाठी देण्यात आली आहेत. हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांनी आपले प्रमाणपत्र  शिक्षणाधिकारी (माध्य) कार्यालयाकडून शुक्रवार 16 फेब्रुवारी 2018 पर्यंत हस्तगत करावेत, असे आवाहन  लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.

000000
हरभरा पिकासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 6 :-  हरभरा पिकावरील घाटेअळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी, फवारणी करावी. मर रोग नियंत्रणासाठी कार्बेडेझीम 50 डब्ल्यू पी 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

000000
केळी पिकाचा कृषि संदेश
नांदेड, दि. 6 :-  केळीच्या पानावर रोगाचा प्रादुर्भाव आकाराने जास्त असेल तर त्याचा परिणाम प्रकाश संश्लेषणावर होतो. पानाचा प्रादुर्भावग्रस्त भाग काढून टाकावा. कार्बेन्डॅझिम 0.5 टक्के (0.5 मि.ली.) मिनरल ऑईल 1 टक्के (10 मिली ) टाकुन फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.
00000
पाच दिवसांत  साडेतीन हजार
क्विंटलपेक्षा  अधिक  तूर खरेदी
सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख
मुंबई, दि. 5 : राज्यात १ फेब्रुवारीपासून आधारभूत दराने तूर खरेदीला सुरुवात झाली आहे.आजपर्यंत १६० तूरकेंद्रांवर ३३९ शेतकऱ्यांची ३७५५.६१ क्विंटल तूर खरेदी  करण्यात आली, अशी माहिती सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली.
तूर खरेदी केंद्रावर साधारणत १लाख ४६ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तूर खरेदी तीन महिने चालणार असून आजचा पाचवा दिवस आहे.तूर खरेदी केंद्राला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद असून तूर खरेदीसाठी उपलब्ध खरेदी केंद्रांशिवायही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारसीनुसार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेतअसेही पणन मंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.
 तूरखरेदी साठी शेतकरी नोंदणी आवश्यक असून त्यासाठी NELM पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर अथवा बाजार समिती आवारात जावे लागू नयेयासाठी मंडळस्तरावर अथवा मोठ्या गावामध्ये तुरीची नोंदणी करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे. नोंदणीच्या वेळी शेतकऱ्यांनी आधारकार्डची छायाकींत प्रतसुरू असलेल्या बँक खात्याचे पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत अथवा त्या खात्याचा रद्द केलेला धनादेश (चेक)सातबारा उतारा आदी कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना खरेदीचे चुकारे ऑनलाईन बँक खात्यात जमा होणार असल्यामुळे बँक खात्याची नोंदणी अचूक करावी.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करून तूर खरेदी योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन सहकारमंत्री श्री. देशमुख यांनी केले आहे.
००००



  वृत्‍त क्र.   36 6 एमएच-सीईटी परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   नांदेड , दि.   19   : - एमएच-सीईटी परीक्षा-2024     ही 2...