Friday, March 17, 2017

जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन संपन्न
       नांदेड दि. 17 :- नांदेड पाटबंधारे मंडळाच्यावतीने साजरा करण्यात येणाऱ्या जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन गुरुवार (दि.16) रोजी सर विश्वेश्वरय्या सभागृह भगीरथनगर नांदेड येथे पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता बी. एस. स्वामी यांचे हस्ते गोदावरीतील पाण्याचा कलश पुजनाने करण्यात आले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी टी. एस. मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
       
बुधवार 22 मार्च 2017 रोजी जागतीक जल दिनानिमीत्त  शासन निर्णयानुसार गुरुवार 16 मार्च 2017 ते बुधवार 22 मार्च 2017 या कालावधीत जलजागृती सप्ताह साजरा होत आहे.  यावेळी पाण्याचे महत्व समजावुन सांगण्यात आले. पाण्याचा अपव्यय टाळण्याबाबत मार्गदर्शन करुन जलजागृती सप्ताह यशस्वी करण्याबाबत आवाहन करण्यात आले.
प्रस्तावीक कार्यकारी अभियंता ए. ए. मेश्राम यांनी केले तर सुत्रसंचलन सहायक अभियंता एस. डी. पवार यांनी केले. यावेळी कार्यकारी अभियंता सर्वश्री मेश्राम, बारडकर, राठोड, मठपती, अवस्थी, शेटे आदी उपस्थित होते. 

0000000
रास्‍तभाव दुकानदारांसाठी आज
 ई-पीओएस मशिनचे प्रशिक्षण  
नांदेड दि. 17 :-  रास्‍तभाव दुकानदारांसाठी ई-पीओएस मशिनचे प्रशिक्षण शनिवार 18 मार्च 2017 रोजी सकाळी 10 वा. जिल्‍हा पुरवठा अधिकारी व तहसिलदार नांदेड यांच्‍या अध्‍यक्षतेखाली तहसिल कार्यालय नांदेड येथे आयोजीत करण्‍यात आले आहे.
यावेळी नांदेड तालुक्‍यातील रास्‍तभाव दुकानदारांना ई-पीओएस मशिनचे प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. प्रशिक्षणास रास्‍तभाव दुकानदारांनी स्‍वतः उपस्थित रहावे , असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.

000000
जलदौड स्पर्धेचे रविवारी आयोजन
नांदेड दि. 17 :- जलसंपदा विभागामार्फत गुरुवार 16 ते बुधवार 22 मार्च 2017 कालावधीत राज्यात जलजागृती सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्याअनुषंगाने रविवार 19 मार्च 2017 रोजी  सकाळी 6.30 वा. आयटीआय चौक-शिवाजीनगर ते  जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जलदौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या जलदौडमध्ये शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिकांना सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता लेंडी प्रकल्प विभाग देगलूर यांनी केले आहे.  
या स्पर्धेत वय 25 वर्षे व 25 वर्षापुढील वयोगट असे दोन गट करण्यात येणार आहेत. प्रत्येक गटातून प्रथम व द्वितीय विजेता घोषित करण्यात येणार असून विजेत्यांना सन्मानपत्र, रोख बक्षिस देण्यात येणार आहे.  

0000000
वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दौरा
नांदेड दि. 17 :- राज्याचे वित्त आणि नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 19 मार्च 2017 सांताक्रूझ विमानतळ मुंबई येथून शासकीय विमानाने सकाळी 10 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने उत्तमराव पाटील बायोडिर्व्हसिटी पार्क बोंडर ता. जि. नांदेडकडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. उत्तमराव पाटील बायोडिर्व्हसिटी पार्क बोंडर येथे आगमन व राखीव. सकाळी 11.30 वा. बोंडरहून मोटारीने नांदेडकडे प्रयाण करतील. दुपारी 12 वा. नांदेड येथे आगमन व आर्यवैश्य समाज मेळाव्यास उपस्थिती. स्थळ चांदोजी पावडे मंगल कार्यालय कॅनलरोड नांदेड. सायं. 7.30 वा. मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. रात्री 8 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000000