Thursday, March 16, 2017

रास्तभाव धान्य दुकानात
एप्रिलसाठी साखर उपलब्ध
नांदेड दि. 16 :- सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत नांदेड जिल्‍हयातील बीपीएल व अंत्‍योदय शिधपत्रिकाधारकासाठी शासनाने एप्रिल 2017 साठी नियमित नियतन साखर प्रति व्‍यक्‍ती 500 ग्रॅम प्रमाणे प्रौढ अथवा मूल / बालक असा भेदभाव न करता मंजूर केले आहे. एप्रिल 2017 या महिन्‍यात जिल्‍हयासाठी 4 हजार 575 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्‍त झाले असून पुढील प्रमाणे तालुका निहाय नियतन देण्‍यात आले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्‍यक्ष शिधापत्रिकाधारकास संबंधीत स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत वितरण करण्‍यात येणार आहे.
नांदेड लोहा- 533 , हदगाव- 399, किनवट- 527, भोकर- 175, बिलोली- 287, देगलूर- 255, मुखेड- 487, कंधार- 374, लोहा- 323, अर्धापूर- 129, हिमायतनगर- 199, माहूर- 195, उमरी- 134, धर्माबाद-151, नायगाव- 262, मुदखेड- 145. याची सर्व बीपीएल, अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍तधान्‍य दुकानातून साखरेची उचल करावी , असे आवाहन जिल्‍हाधिकारी नांदेड यांच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी  केले आहे.

0000000
राज्यातील सात लोकसमुहांना
अल्पसंख्यांक दर्जा
नांदेड दि. 16 :- राज्यातील लोकसमुहांपैकी मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, झोराष्ट्रीयन (पारसी), जैन व ज्यु अशा एकूण सात लोकसमुहांना "अल्पसंख्याक लोकसमुह" म्हणून घोषित करण्यात आले आहे. याची नोंद शासकीय तसेच विविध यंत्रणांनी घ्यावी, असे आवाहन राज्याच्या अल्पसंख्यांक विकास विभागाने एका परिपत्रकाद्वारे केले आहे.
या परिपत्रकातील आशय पुढील प्रमाणे, राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, झोराष्ट्रीयन (पारसी), जैन व ज्यु या सात लोकसमुहांना अल्पसंख्याक लोकसमूह असा दर्जा आहे. तथापि संबंधित लोकसमुहातील जनता व त्यांच्यासाठी योजना राबविणाऱ्या यंत्रणांमध्ये याबाबत पुरेशी जागरुकता नसल्याचे निदर्शनास येते.  परिणामी, अल्पसंख्याकांसाठी केंद्र शासन व राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना या लोकसमुहांपर्यंत पोहचण्यास अडचण येतात.
त्यामुळे सर्व प्रशासकीय विभागांनी राज्यातील लोकसमुहांपैकी मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, झोराष्ट्रीयन (पारसी), जैन व ज्यु या लोकसमुहांना शासनाने अल्पसंख्याक लोकसमुह म्हणून दर्जा दिला असल्याची बाब लक्षात घेवून योजनांची आखणी करावी व अल्पसंख्याक लोकसमुहांना त्याचा लाभ होईल याची दक्षता घ्यावी. तसेच आपल्या अखत्यारितील क्षेत्रामध्ये याबाबत संबंधित लोकसमुहांमध्ये जागरुकता निर्माण करावी, असेही निर्देशीत करण्यात आले आहे.

0000000
डिजीटल प्रदानांतर्गत 24 मार्च रोजी होणाऱ्या
डिजीधन मेळाव्याचे सुनियोजन करा - काकाणी
विविध घटकांना सहभागी होण्याचे, लाभ घेण्याचे आवाहन
नांदेड दि. 16 :- केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या धोरणानुसार डिजीटल प्रदान मोहिमेअंतर्गत डिजीधन मेळावा शुक्रवार 24 मार्च 2017 रोजी आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण नियोजन भवन परिसरात या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्याचे सुनियोजन करा, तसेच शासकीय, निमशासकीय संस्था, कार्यालये यांनी नाविन्यपुर्ण उपक्रमांद्वारे रोकडरहित (कॅशलेस) व्यवहाराना चालना देण्यासाठी पुढाकार घ्यावा , असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले. मेळाव्याच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून श्री. काकाणी बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. यावेळी मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित घोषवाक्य स्पर्धेचीही घोषणा करण्यात आली.      
बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॅा. सुधीर भातलंवडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, जिल्हा सहकार उपनिबंधक विनायक कहाळेकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे (एनआयसी) चे  माहिती अधिकारी सुनील पोटेकर यांच्यासह महापालिका, विविध बँकांचे, डिजिटल पेमेंटशी निगडीत संस्था आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डिजीधन मेळाव्याचा मुख्य कार्यक्रम नियोजन भवनमध्ये होणार आहे. या मेळाव्यात डिजीटल प्रदानाशी निगडीत बँका, तसेच विविध व्यापारी कंपन्या, शासकीय विभाग आदी सहभागी होणार आहेत.
 जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी मेळाव्याच्या निमित्ताने जिल्ह्यात 8 नोव्हेंबर 2016 पासून 20 मार्च 2017 पर्यंत कॅशलेस व्यवहारांच्या दृष्टीने उत्कृष्ट आणि नाविन्यपुर्ण उपक्रम राबवून , अशा व्यवहारांत लाक्षणीकरित्या वाढ केलेल्या संस्था, बँका आदींनाही सन्मानित करण्याचे जाहीर केले. ते म्हणाले की, यापुढे रोकडरहित (कॅशलेस) व्यवहारांशिवाय पर्याय नाही, ही बाब नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी हा डिजीधन मेळावा उत्कृष्ट संधी आहे. यामध्ये बँकांसह, शासकीय, निमशासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनीही उत्स्फुर्त सहभाग घ्यावा. जेणेकरून शासकीय व्यवहार, तसेच लाभार्थ्यांपर्यत पोहचविण्यात येणारा लाभ आणि अन्य नाविन्यपुर्ण डिजिटल उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविता येईल.
रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच डिजीटल व्यवहारांची माहिती व्हावी या उद्देशाने आयोजित या मेळाव्यात डिजीटल व्यवहार करणाऱ्यांसाठीच्या भाग्यवान बक्षीस विजेत्यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. मेळाव्यात बँका, आधार क्रमांकाशी निगडीत तसेच विविध डिजीटल प्रदान क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या, मोबाईल कंपन्या, खते, इंधन आदी कंपन्याही सहभागी होणार आहेत. मेळाव्यात बँका व इतर सहभागी घटक यांची विविध प्रकारची दालने असतील. याठिकाणी डिजीटल प्रदानाच्या व्यवहारांची प्रात्यक्षिके तसेच खरेदी आदीबाबत माहिती दिली जाणार आहे.
मेळाव्याच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित भाग्यवान विजेत्याची (लकी ड्रॅा) काढण्यात येणार आहे. या विजेत्यांना मुख्य समारंभात सन्मानितही करण्यात येणार आहे. या एक दिवसीय डिजीधन मेळाव्यात विविध दालनांद्वारे ग्राहक तसेच सामान्य नागरिकांना डिजीटल प्रदानाबाबत प्रशिक्षीत करण्याचा प्रयत्न राहणार आहे. यात बँका व्यापाऱ्यांसाठी  पीओएस  मशीन्सची  नोंदणी  करून घेतील. तसेच नवीन खाती उघडणे, आधार क्रमांकाशी  बँक  क्रमांक संलग्न करणे, विविध बँकाच्या युपीआय ॲप्सची माहिती देतील. याशिवाय खासगी मोबाईल कंपन्या, तसेच डिजीटल प्रदान क्षेत्रातील कंपन्या ई वॅालेटस्, मोबाईल वॅालेटस् यांची माहिती देतील. याशिवाय सेवा तसेच विविध वस्तू, तसेच खत, दूध, शेतकरी सोसायट्या, कृषीविषयक, बी-बियाणे, पुरवठा विभाग आदींनाही डिजीटल प्रदानांची माहिती देण्यासाठी दालन उभारण्यात येणार आहेत.
अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनीही उत्स्फुर्त सहभाग आणि नाविन्यपुर्ण उपक्रमांद्वारे मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन केले. सुरवातीला निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी डिजीधन मेळाव्याची रुपरेखा स्पष्ट केली, तसेच शेवटी आभारही मानले.

0000000