Saturday, March 4, 2017

उष्‍णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी
नागरीकांनी काळजी घ्‍यावी - जिल्‍हा प्रशासन
नांदेड दि. 4 :- उन्‍हाळयाची सुरुवात यावर्षी लवकरच झाली असून मार्च ते जून  या कालावधीत राज्‍यात उष्‍णतेची तिव्रता निर्माण होण्‍याची शक्‍यता भारतीय हवामान खात्यानी व्‍यक्‍त केली आहे.  या उष्‍णतेच्‍या लाटेपासुन बचाव करण्‍यासाठी नागरीकांनी व परिक्षांचा कालावधी पुढे सुरु होत असल्‍यामुळे विद्यार्थ्यांनी योग्‍य ती खबरदारी घ्‍यावी, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनातर्फे करण्‍यात आले आहे.  
उष्‍माघातामुळे शरीराचे तापमान वाढुन व्यक्ती बेशुद्ध झाल्यास तातडीचे वैद्यकीय उपचार करावे. उष्माघात होऊ नये यासाठी सोबत मोठा पांढरा पंचा आणि डोके झाकेल असा रुमाल, पूर्ण अंगभर शक्यतो सुती कपडे परिधान करणे, कमीत कमी वेळात इच्छित स्थळी पोहोचणे, जवळ पाण्याची बाटली बाळगणे, दर अर्ध्या तासाने दोन तीन ग्लास पाणी पिणे, अधून-मधून बर्फ न टाकलेले लिंबू पाणी, फळांचे रस पिणे अशा उपायानी उष्माघात टाळता येतो.ष्माघातावरील उपचार शरीराच्या तापमान वाढीच्या कारणावर अवलंबून आहेत.
कडक उन्हामध्ये शरीराचे तापमान वाढल्याची शंका येताच स्वत:च्या रक्षणासाठी सावलीमध्ये बसणे आणि भरपूर पाणी पिणे या उपायानी पुरेसा आराम मिळतो. बाहेरील तापमान चाळीसहून अधिक आणि शरीराचे तापमान चाळीस झाल्यास उष्माघात होतो.     प्रखर तपमानात बाहेर उन्हात फिरल्‍याने शरीरातील पाण्याची मात्रा अचानक कमी होते व मृत्यु ओढावतो. कानास फडके न बांधल्‍याने उष्णता मेंदुपर्यंत जाते व व्‍यक्‍ती बेशुध्‍द होते, उपाशी पोटी उन्हात फिरल्‍याने शरीरास साखरेचा, ग्लुकोजचा पुरवठा कमी होतो. ती थंड पाणी पिल्‍याने शरीराच्या तापमानात अचानक बदल होतो. अश्‍यावेळी त्‍वरीत वैद्यकीय उपचार घेणे आवश्‍यक आहे. कारण नसताना उन्‍हात न जाणे, भरपुर पाणी पिणे आणि  सुती  कपडे परिधान करने याद्वारे उष्‍माघात टाळता येतो.
नागरीकांना उष्‍माघाताचा रुग्‍ण आढळल्‍यास तात्‍काळ त्‍यास जवळच्‍या रुग्‍णालयात प्रथमोपचारासाठी पाठवावे. मागील वर्षापेक्षा यावर्षी उन्‍हाळयाची सुरुवात लवकर झालेली असुन उष्‍णतेच्‍या लाटेपासून कोणत्‍याही प्रकारची जीवित‍हानी होऊ न देण्‍यासाठी जिल्‍हयातील महानगरपालिका आणि आरोग्‍य यंत्रणेशी समन्‍वय साधून उष्‍णतेच्‍या  लाटेपासुन नागरीकांचे बचाव करावयाच्‍या तसेच यंत्रणा सज्‍ज ठेवावयाच्‍या सूचना जिल्‍हा प्रशासनाव्‍दारे निर्गमित करण्‍यात आल्‍या आहेत. उष्‍णतेची तिव्रता आणि तापमानात अचानक होणा-या  वाढीवर नागरीकांनी व विद्यार्थ्यांनी सावधगिरी बाळगावी, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

000000
छत्तीसगड अल्पसंख्यांक आयोगाचे
अध्यक्ष केंम्बो यांचा नांदेड दौरा
नांदेड दि. 4 :-  छत्तीसगड राज्याच्या अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) सुरेंद्रसिंह केंम्बो हे शनिवार 11 मार्च ते मंगळवार 14 मार्च 2017 या कालावधीसाठी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 11 मार्च रोजी रायपूर येथून रात्री 10 वा. नांदेड येथे श्री गुरुगोबिंदसिंघजी भवन येथे आगमन व मुक्काम. रविवार 12 मार्च ते मंगळवार 14 मार्च या कालावधीत ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतील. विशेषत: सोमवार 13 मार्च रोजी दुपारी 12 वा. अल्पसंख्यांक संवर्गातील घटकांशी संवाद साधतील. मंगळवार 14 मार्च रोजी सायंकाळी 6 वा. नांदेडहून रायपूरसाठी प्रयाण करतील.

0000000
जि. प. अध्यक्ष , उपाध्यक्ष निवडीसाठी
21 मार्चला विशेष सभा
पं. स. सभापती , उपसभापती निवड 14 मार्चला
नांदेड दि. 4 :- जिल्‍हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2017 पार पडल्‍यानंतर   नांदेड जिल्‍हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक मंगळवार 21 मार्च 2017 रोजी तर जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक मंगळवार 14 मार्च 2017 रोजी होणार असल्याचे जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूक विभाग जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी कळविले आहे.
 याबाबत निवडणूक विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या प्रगटनात म्हटले आहे की, जिल्‍हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2017 पार पडल्‍यानंतर   जिल्‍हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणामधून निवडून आलेल्‍या सदस्‍यांची नावे राज्‍य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यापुर्वीच 28 फेब्रुवारी 2017 रोजी शासन राजपत्रात प्रसिध्‍द करण्‍यात आल आहे.
जिल्‍हा परिषद नांदेडच्‍या अध्‍यक्ष व उपाध्‍यक्ष पदाची निवड करुन जिल्‍हा परिषदेचे गठन करण्‍याकरीता  जिल्‍हा परिषदेची पहिली विशेष सभा दि. 21 मार्च 2017 रोजी कै. यशवंतराव चव्‍हाण सभागृह, जिल्‍हा परिषद नांदेड येथे आयोजित करण्‍यात आलेली असन त्‍यासंबंधीच्‍या नोटीसा जिल्‍हा परिषदेच्‍या नवनिर्वाचित सदस्‍यांना  पिठासीन अधिकारी यांचेकडून निर्गमित होतील.
तसेच पंचायत समितीच्‍या सभापती व उपसभापती पदाची निवड करुन पंचायत समितीचे गठन करण्‍याकरीता जिल्‍हयातील सर्व पंचायत समित्‍यांची पहिली विशेष सभा मंगळवार 14 मार्च 2017 रोजी आयोजित करण्‍यात आलेली असून त्‍यासंबंधीच्‍या नोटीसा सर्वसंबंधित पिठासन अधिकारी यांचेकडून  पंचायत समितीच्‍या नवनिर्वाचित सदस्‍यांना निर्गमित होतील. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठीच्या या निवडणुकीसाठी संबंधीतांना या दिवशी सकाळी 10 ते दुपारी 12 यावेळेत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार आहेत. त्यानंतर दुपारी 2 वा. निवडीसाठीच्या विशेष सभा होणार आहेत.
पंचायत समितीच्‍या नवनिर्वाचित सभापती यांना मंगळवार 21 मार्च 2017 रोजी आयोजित करण्‍यात आलेल्‍या जिल्‍हा परिषदेच्‍या पहिल्‍या विशेष सभेच्‍या नोटीसा मंगळवार 14 मार्च 2017 रोजीच संबंधित पिठासीन अधिकारी यांचेकडून देण्‍यात येतील.त्‍याप्रमाणे त्‍यांना मंगळवार 21 मार्च 2017 रोजीच्‍या विशेष सभेस उपस्थित राहण्‍याचा अधिकार आहे. तथापि त्‍यांना मतदान प्रकियेत भाग घेता येणार नाही. 
पंचायत समितीच्‍या तसेच जिल्‍हा परिषदेच्‍या पहिल्‍या विशेष सभेस पिठासीन अधिकारी यांचेकडून निर्गमित होणा-या विशेष सभेच्‍या नोटीसीच्‍या अनुषंगाने विशेष सभेस  सर्व संबंधित नवनिर्वाचित सदस्‍यांनी  उपस्थित रहावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
000000