Tuesday, February 28, 2017

डिजीटल प्रदानांतर्गत डिजीधन मेळावा
6 ऐवजी 24 मार्च रोजी होणार
नियोजन भवन येथे आयोजन
नांदेड दि. 28 :- केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या धोरणानुसार डिजीटल प्रदान मोहिमे अंतर्गत राज्यभरात डिजीधन मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. नांदेड जिल्ह्यात अशा या डिजीधन मेळाव्याचे सोमवार 6 मार्च 2017 रोजी आयोजन करण्यात येणार होते. तथापी निती आयोगाच्या बदललेल्या वेळापत्रकानुसार हा मेळावा शुक्रवार 24 मार्च 2017 रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे , जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे. 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण नियोजन भवन परिसरात या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. नियोजन भवन मध्ये मुख्य कार्यक्रम होणार आहे. या मेळाव्यात डिजीटल प्रदानाशी निगडीत बँका, तसेच विविध व्यापारी कंपन्या, शासकीय विभाग आदी सहभागी होणार आहेत.
 रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच डिजीटल व्यवहारांची माहिती व्हावी या उद्देशाने आयोजित या मेळाव्यात डिजीटल व्यवहार करणाऱ्यांसाठीच्या भाग्यवान बक्षीस विजेत्यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. या मेळाव्यात बँका व इतर सहभागी घटक विविध दालनांद्वारे डिजीटल प्रदानाच्या व्यवहारांची प्रात्यक्षिके, माहिती देणार आहे.
0000000


पोलीस, सैन्यदल पूर्व प्रशिक्षणासाठी   
गुरुवारी नांदेड येथे निवड शिबीर
अ.जा., नवबौद्ध घटकातील तरुणांसाठी संधी

नांदेड दि. 28 :- अनुसूचित जाती व नवबौध्द  घटकातील युवक व युवतींसाठी अमरावती येथे आयोजित सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी गुरुवार 2 मार्च 2017 रोजी नांदेड जिल्हयातील उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी  केले आहे.
            सामाजिक न्याय व सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवक व युवतींसाठी सैन्य व पोलीसमध्ये भरती करण्याकरिता भरतीपुर्व प्रशिक्षण कार्यक्रम मंजूर केला आहे. प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिन्यांचा असून प्रशिक्षण श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे होणार आहे. प्रशिक्षणार्थी 38 पैकी 30 टक्के महिला आरक्षण असल्याने 27 पुरुष व 11 महिला प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवकांसाठी सैन्य व भरतीपुर्व प्रशिक्षणासाठी पात्र अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत.
            उमेदवार हा महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. उमेदवाराचे वय हे 18 ते 25 वयोगटातील असावे. उमेदवाराची पुरुष उंची 165 से.मी व महिला उंची 155 से.मी. छाती न फुगवता पुरुष 79 से.मी. (फुगवुन 84 से.मी. ) असावी. शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी पास. जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, सेवायोजन कार्यालयातील नोंदणी आणि ओळखपत्राची सत्यप्रत देणे आवश्यक राहील. उमेदवार हा शारीरीक व मानसिक दृष्टया निरोगी असावा.
            प्रशिक्षणाच्या निवडीसाठी नांदेड जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवक, युवतीनी गुरुवार 2 मार्च 2017 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेच्या समोर, नमस्कार चौक, नांदेड येथे मूळ कागदपत्रासह व साक्षांकित प्रतीसह उपस्थित राहावे. उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना जाण्या-येण्याचा भत्ता दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असेही आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बी. एन. वीर यांनी यांनी केले आहे.

00000
दहावी, बारावी परीक्षा केंद्रांच्या
 परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड, दि. 28 :-  जिल्ह्यात बारावीच्या (उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र) परीक्षा केंद्र परिसरात 28 फेब्रुवारी 2017 ते 25 मार्च 2017 या कालावधीत व दहावी (माध्यमिक शालांत प्रमाणपत्र) परीक्षा केंद्र  परिसरात 7 मार्च 2017 ते 1 एप्रिल 2017 या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा केंद्रावर 28 फेब्रुवारी ते 25 मार्च या कालावधीत व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा केंद्रावर 7 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत होत आहेत. या परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सकाळी 8 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच या वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.  

000000