Thursday, February 2, 2017

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 640 उमेदवारांचे ,
पंचायत समितीसाठी 892 उमेदवारांचे अर्ज वैध
नांदेड दि. 2 :- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नांदेड जिल्ह्यात दाखल करण्यात नामनिर्देशनपत्रांची आज छाननी करण्यात आली. छाननीनंतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 640 उमेदवारांचे तर पंचायत समिती निवडणुकीसाठी 892 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. उमेदवारीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रांची आज तालुकानिहाय त्या-त्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात छाननी करण्यात आल्याची माहिती ‍ जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी दिली आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 63 गटासाठी 897 व पंचायत समितीच्या 126 गणासाठी 1 हजार 128 नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली होती.   छाननी नंतर वैध ठरलेल्या जिल्हा परिषद गटासाठीच्या उमेदवारांची संख्या तालुहानिहाय पुढील प्रमाणे ( कंसात उमेदवारी अवैध ठरलेल्यांची संख्या ) .
माहूर- 24 (1),  किनवट- अप्राप्त  , हिमायतनगर 38 (1) . हदगाव- 103 (3) अर्धापूर- 23 (2) नांदेड- 69 (1), मुदखेड- 13 (निरंक), भोकर- 45 (3), उमरी- 13 (निरंक), धर्माबाद- 31 (निरंक) , बिलोली- 62 (निरंक), नायगाव- 30 (3), लोहा- 46 (4), कंधार- 45 (निरंक), मुखेड- 45 (3), देगलूर-53 (निरंक). अशारितीने जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीसाठी किनवट वगळता 640 जणांची उमेदवारी वैध ठरली, तर 21 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले.
छाननी नंतर वैध ठरलेल्या पंचायत समिती गण निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची संख्या तालुहानिहाय पुढील प्रमाणे (कंसात उमेदवारी अवैध ठरलेल्यांची संख्या ) .
माहूर- 42 (1),  किनवट- अप्राप्त , हिमायतनगर 36 (निरंक) . हदगाव- 104 (निरंक) अर्धापूर- 32 (1), नांदेड- 74 (1), मुदखेड- 28 (निरंक), भोकर- 61 (1), उमरी- 35 (2), धर्माबाद- 34 (1) , बिलोली- 60 (1), नायगाव- 75 (निरंक), लोहा- 79 (2), कंधार- 81 (निरंक), मुखेड- 81 (निरंक), देगलूर- 70 (1) . अशारितीने पंचायत समिती गणांसाठी दाखल  किनवट वगळता 892 जणांची उमेदवारी वैध ठरली , तर 11 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले.
दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी आज सकाळी 11 वाजल्यापासून सुरु झाली. त्यानंतर वैध व अवैध नामनिर्देशनपत्रांची यादी  प्रसिद्ध करण्यात आली. नामनिर्देशनपत्राचा स्विकार किंवा नामंजूर करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे रविवार 5 फेब्रुवारी 2017 पर्यंत अपिल करता येणार आहे. या अपिलांवर जिल्हा न्यायाधीशांकडून सुनावणी व निकाल देण्याचा संभाव्य शेवटची मुदत बुधवार 8 फेब्रुवारी 2017 राहणार आहे. जिल्हा न्यायाधीशांनी अपील निकालात काढल्यावर वैध उमेदवारांची यादी बुधवार 8 फेब्रुवारी 2017 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम मुदत जिथे अपील नाही तेथे मंगळवार 7 फेब्रुवारी 2017 रोजी दुपारी 3.00वाजेपर्यंत असेल. तर ही मुदत जेथे अपील आहे, तेथे शुक्रवार 10 फेब्रुवारी 2017 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत राहणार आहे. यानंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप जेथे अपील नाही, तेथे मंगळवार 7 फेब्रुवारी 2017 रोजी दुपारी 3.30 नंतर होणार आहे. यादी व चिन्ह वाटप जेथे अपील आहे, तेथे शुक्रवार 10 फेब्रुवारी 2017 रोजी दुपारी 3.30 वाजेनंतर होणार आहे. मतदान केंद्राची यादीही शुक्रवार 10 फेब्रुवारी 2017 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी गुरुवार 16 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी गुरुवार 23 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी दहा वाजेपासून सुरु होणार आहे.

0000000
राष्ट्रीय निवृत्त वेतन योजना सेवा पंधरवड्याचे आयोजन
नांदेड, दि. 2 :-  राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी व संबंधिताच्या जागृती , सुविधाकरीता बुधवार 1 ते 15 फेब्रुवारी 2017 या कालावधीत कोषागार कार्यालय नांदेड येथे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आलेला आहे. या सप्ताह दरम्यान आहरण व संवितरण अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष भेट देवून आपल्या शंकाचे समाधान करुन घेवू शकतात.
राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना प्राणकिट वाटप जिल्हा कोषागार कार्यालयाद्वारे करण्यात आले आहे. या प्राण क्रमांकाद्वारे कर्मचाऱ्यांना स्वत:चे अंशदानाचा तपशील, वारसनोंद, गुंतवणुकीचा परतावा आदीबाबतची माहिती पाहता येते. मोबाईल ॲप डाउनलोड करुन या सुविधेचा वापर करावा व या सेवा पंधरवड्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी मनोज गग्गड यांनी केले आहे.

000000
लोकराज्य फेब्रुवारी 2017 चा 
करिअर विशेषांक प्रकाशित
नांदेड, दि. 2 :- लोकराज्य फेब्रुवारी 2017 चा 'करिअरच्या संधी' हा विशेषांक नुकताच प्रकाशित झाला आहे. स्पर्धा परीक्षा, व्यवसाय शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि बँकिंग आदी क्षेत्रातील करिअरच्या संधी या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित असलेला हा अंक स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. शासन सेवा, खासगी आस्थापना व विविध व्यावसायिक क्षेत्रात आपले करिअर घडविण्यास इच्छुक असणारे उमेदवार व पाल्यांसाठी करिअरचे विविध पर्याय शोधणा-या पालकांसाठी हा अंक मार्गदर्शक ठरणार आहे.
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या मान्यवरांचे मार्गदर्शन  या क्षेत्रातील दिग्गज लेखकांनी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांसाठी लोकराज्यमध्ये आवर्जून केलेले लेखन हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे. या अंकात 'अशा सेवा अशा संधी' या शीर्षकाखाली संघ लोकसेवा आयोगामार्फत ‍विविध महत्त्वाच्या पदांकरिता घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेविषयी महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी कशी करावी याविषयी 'तयारी नागरी सेवा परीक्षे'ची या लेखातून माहिती दिली आहे. तर या परीक्षेच्या विविध टप्प्यांची कशी तयारी करावी या विषयी 'तुम्ही जिंकणारच' हालेख विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांचे संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढावे यासाठी राज्यातील विविध ठिकाणच्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रांच्या माहितीचा या अंकात समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध पदांच्या परीक्षेविषयी माहिती असणाऱ्या लेखाचाही या अंकात समावेश करण्यात आला आहे. तसेच संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या यशवंतांची यशाची सूत्रे'यशाची प्रेरणा' या लेखामधून देण्यात आली आहेत.
आपल्या क्षमता ओळखून, शैक्षणिक पात्रता या आधारे तसेच आवड, छंद यातूनही उत्तम करिअर कसे करता येते हे 'करिअर कसे निवडावे' या लेखातून सांगण्यात आले आहे. तसेच आजचे युग हे माहितीयुग आहे. सध्या सोशल मीडियाचा वाढता वापर व सोशल मीडियामध्ये डिजिटल मार्केटिंग हे नवे क्षेत्र नावारुपाला आले आहे. यातील नवनव्या संधींचा लाभ घेण्यासाठी कोणती आवश्यक पात्रता असावी व या संधी कोठे उपलब्ध आहेत यासंबंधीची माहिती 'डिजिटल मार्केटिंग: नवे क्षेत्र' या लेखातून देण्यात आली आहे. तसेच बँकिंग क्षेत्रातील विविध परीक्षा, व्यवसाय शिक्षण आणि त्यामुळे मिळणाऱ्या रोजगाराची संधी, नर्सिंग क्षेत्रातील करिअर, जनसंपर्क आणि माध्यमांतील संधी, फाईन आर्ट आणि कृषी क्षेत्रातील कौशल्याधारित अभ्यासक्रमांच्या माहितीचा या अंकात समावेश करण्यात आला आहे. प्रत्येकाच्या घरात संग्रहणीय ठरावा असा हा अंक राज्यात स्टॉलवर सर्वत्र उपलब्ध असूनया अंकाची किंमत फक्त 10 रुपये आहे.

000000