Thursday, November 16, 2017

प्रामाणिक पत्रकारिता काळाची गरज
- जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम
नांदेड , दि. 16 :- देशाच्या विकासात माध्यमांचा मोठा सहभाग लक्षात घेता प्रामाणिक पत्रकारिता करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांनी केले.
भारतीय प्रेस परिषदेच्या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त आयोजित राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात "माध्यमासमोरील आव्हाने" या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. कदम बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी हे होते.  
डॉ. कदम पुढे म्हणाले की, माध्यमांनी कर्तव्य पार पाडत असतांना समाजात चांगले बदल घडविण्याची पत्रकारिता केली पाहिजे. पत्रकारितेत विश्वासार्हता असावी. माध्यमांची गती वाढली असून संदर्भासाठी इंटरनेटवरुन माहितीची पडताळणी करुन घेण्याची जबाबदारी वाढली आहे. घटनेसंबंधी लिखाण करतांना नेमकी माहिती घेऊन तसेच सत्यता पाहून लिखाण केले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.   
जेष्ठ पत्रकार श्री. जोशी म्हणाले, पत्रकारिता ही स्वत:पुर्ती मर्यादीत न राहता भारतीय घटनेशी बांधील तसेच समाजाला न्याय देणारी पत्रकारीता असावी. स्वातंत्र्यापुर्वीपेक्षा स्वातंत्र्यानंतरची आजची पत्रकारीता वेगाने पुढे जात आहे, हे लक्षात घेऊन पत्रकारांनी लिखाण करावे, असेही ते म्हणाले.  
प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजनकरुन तसेच पुष्पहार अर्पणकरुन अभिवादन करण्यात आले.  
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सर्वसाधारण सहायक के. आर. आरेवार यांनी केले तर शेवटी दुरमुद्रक चालक विवेक डावरे यांनी आभार मानले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार माधव अटकोरे, संपादक तथा माजी आमदार गंगाधर पटणे, संपादक जी. के. मांजरमकर, रमेश कंधारकर, दै. सकाळचे पत्रकार शिवचरण वावळे, दै. लोकपत्रचे प्रशांत गवळे, पत्रकार स्वप्नील भालेराव, विलास वाघमारे, राजकुमार शितळे, सुनिल गोदणे, छायाचित्रकार पुरुषोत्तम जोशी, सेवानिवृत्त माहिती सहाय्यक रमाकांत ताटीकोंडलवार, लिपीक टंकलेखक अलका पाटील, प्रविण बिदरकर, बालनरस्या अंगली आदींची उपस्थिती होती.  

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र. 283

  वृत्त क्र.   283 निवडणूक खर्च निरीक्षक नांदेडमध्ये दाखल ; खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आवाहन नांदेड, दि. 28 : लोकसभा निवडणूक ही अतिशय गं...