Monday, September 25, 2017

विद्यार्थ्यांनी मुलाखतीस आत्मविश्वासाने सामोरे जावे
- प्रा. मनोहर भोळे
नांदेड दि. 25 :- मुलाखत ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाची परीक्षा असून महाराष्ट्र लोकसेवा आयोग याबाबत विद्यार्थी निवड केलेल्या पदासाठी कितपत योग्य आहे हे मुलाखतीत तपासले जाते. पूर्व आणि मुख्य परीक्षेद्वारे  विद्यार्थ्यांनी ज्ञानाची परीक्षा उत्तीर्ण केलेली असते. त्यामुळे मुलाखतीचा  ताण न बाळगता आत्मविश्वासाने सामोरे गेल्यास यश हमखास प्राप्त होते, असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तथा मुलाखत तज्ञ प्रा. मनोहर भोळे यांनी केले. "उज्ज्वल नांदेड" मोहिमेअंतर्गत जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित
करण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या प्रतिरूप मुलाखतीच्या प्रसंगी आयोजित मार्गदर्शन प्रसंगी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील व निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी गठीत केलेल्या  मुलाखत मंडळामध्ये प्रा. मनोहर भोळे, पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर, उपअधीक्षक भूमी अभिलेख बळवंत मस्के, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी चंदेल, अप्पर कोषागार अधिकारी विशाल हिवरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांचा समावेश होता. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 80 विद्यार्थ्यांच्या 23 व 24 सप्टेंबर या दोन दिवसांमध्ये  मुलाखती नियोजन भवन, नांदेड येथे घेण्यात आल्या.  
प्रा. भोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुलाखतीचे बारकावे, पोशाख, बसण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, संवाद शैली या सर्व बाबी विषयी माहिती दिली तसेच एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहीत नसल्यास नम्रपणे माहीत नसल्याचे सांगावे, चुकीचे वा असंबद्ध उत्तर देऊ नये, असे त्यांनी सांगितले. अशोक बनकर व बालाजी चंदेल यांनी पोलीस प्रशासनाबाबत विद्यार्थ्यांना उपयुक्त असे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांचे सुद्धा पॅनल तयार करुन त्यांची मुलाखत देणारे व मुलाखत घेणारे या दोन्ही भुमिकेतुन तयारी करून घेण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्याचे प्रकर्षाने जाणवले. या मुलाखतीच्या आयोजनासाठी शैलेश झरकर, प्रताप सूर्यवंशी, आरती कोकुलवार, अजय वट्टमवार, कोंडीबा गादेवाड, मुक्तीराम शेळके,वैभव शहाणे,मयूर वाकोडे व राहुल बोकारे यांनी परिश्रम घेतले.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...