Thursday, April 20, 2017

जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना
उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार
नागरी सेवा दिन व राजीव गांधी प्रशासकीय गतिमान अभियान निमित्त
मुंबईत आज पुरस्कार वितरण

नांदेड दि. 20 :- जलयुक्त शिवार अभियानातून राज्यासाठी तीन महत्त्वपुर्ण पॅटर्न, वंचितांसाठी अन्न सुरक्षा आणि उज्ज्व नांदेड अशा अभिनव संकल्पनांना मुर्त
रूप देण्यासाठी सातत्यपुर्ण प्रयत्न करणारे नांदेड जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरव प्राप्त झाला आहे. नागरी सेवा दिनानिमित्त व राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत राज्य सरकारने जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण शुक्रवार 21 एप्रिल 2017 रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
या निवडीसाठी आज येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री अर्जून खोतकर यांनीही जिल्हाधिकारी काकाणी यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरव प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदनही केले आहे.
जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी नांदेड जिल्ह्यात रूजू झाल्यापासूनच लोकाभिमुख तसेच अनेक नाविन्यपुर्ण संकल्पना राबविण्यात सातत्य ठेवले आहे. या सर्व कामांचा या पुरस्कारासाठी निवड करताना विचार करण्यात आला. विशेषतः मे 2015 मधील दुष्काळाच्या झळा तसेच टंचाईचा मुकाबला करण्यासाठी त्यांनी विविधस्तरावर प्रयत्न केले. विविध यंत्रणांचा समन्वयही साधला. यामुळे पाणी टंचाईवर यशस्वीपणे मात करता आली. त्यासाठी इसापूर धरणातून थेट बाभळी बंधाऱ्यापर्यंत कमीतकमी खर्चात, आणि पाण्याचा कमीत कमी अपव्यय होऊन पिण्याचे पाणी उपलब्ध करता आले होते. नांदेड शहरासाठीही येलदरी धरणातून विष्णुपुरीपर्यंत पाणी आणण्यात आले होते.
नांदेड जिल्ह्याने जलयुक्त शिवार अभियानातून राज्यासाठी नाविन्यपुर्ण असे पॅटर्न देण्याचा मान पटकाविला आहे. या पॅटर्नच्या विकासाठी जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी यंत्रणांना प्रोत्साहन दिले. यातूनच उगम ते संगम नाला पुनरुज्जीवन, जलपुनर्भरण स्तंभ (रिजार्च शॅाफ्ट), विहीर पुनर्भरण अशा संकल्पना विकसित झाल्या. यामुळे नांदेडमधील जलयुक्त शिवार अभियानातील कामही वैशिष्ट्यपुर्ण ठरले. त्यातूनच जिल्ह्यात यंदा पिण्याच्या पाण्यासाठी लागणाऱ्या उन्हाळ्यातील टँकर्सची संख्याही लक्षणीयरित्या घटली. आता अवघे सहा ते सात टँकरने जिल्ह्यात पाणी पुरविले जाते, या तुलनेत गतवर्षी ही संख्या शेकड्यावर होती. विशेषतः कंधार-लोहा या भागातील टँकर्सची संख्या कमी झाल्याबाबत लोकप्रतिनीधींनीही थेट जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी व विविध यंत्रणांचे अभिनंदन केले आहे.
जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी स्वच्छ भारत मिशनमध्येही जिल्ह्यातील चौदाही नगरपालिका क्षेत्रात महास्वच्छता अभियान प्रभावीरित्या राबविले. यामुळे या नागरीक्षेत्रातील स्वच्छतेसाठीही जिल्ह्याला राज्यस्तरावर सन्मानित करण्यात आले आहे. टंचाईच्या परिस्थितीतही जिल्ह्याची महसुली वसुली 105 टक्क्यांवर नेण्यातही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी यश मिळविले आहे. याशिवाय प्रलंबित महसुली प्रकरणे निकाल काढण्यातही आघाडी ठेवली आहे. माहूर विकास प्राधिकरण आराखड्यासाठी 216 कोटी रुपयांचा भरीव निधी मिळविण्यासाठीही प्रयत्न केले आहेत. विष्णुपूरी उपसा जलसिंचनास चालना देण्यामुळे लोहा-कंधार भागातील कालवे पुनरूज्जीवत झाले, त्यातून खरीपासह, रब्बी आणि उन्हाळी पिके घेण्याचे नियोजन, त्या परिसरातील शेतकऱ्यांना करता आले आहे. जिल्ह्यातील पीक पद्धतीत सकारात्मक बदल व्हावा, शेतकऱ्यांनी कृषी पूरक उद्योगांसाठीही प्रयत्न करावेत यासाठी जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी विविध यंत्रणांना एकात्मिक पद्धतीने काम करण्यासाठी प्रोत्साहीत केले आहे. शेतकरी गटही स्थापन केले.  
जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्ताने सुरु करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रमाला उज्ज्वल नांदेड म्हणून आगळ्या पद्धतीने पुढे नेले. त्यामुळे हा उपक्रम आता अव्याहतपणे सुरु आहे. ज्याद्वारे नांदेड जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांतील विविध विषयांचे थेट विषयाशी निगडीत मार्गदर्शन मिळणे सुरु झाले आहे. यातून जिल्ह्यातील सुमारे शंभरहून अधिक उमेदवारांना विविध स्पर्धा परीक्षांचे यश मिळाले आहे. विविध उपक्रमात सामाजिक संस्थांचाही उत्कृष्ट सहभाग मिळविण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी झाले आहे. ज्यामध्ये सगरोळीची संस्कृती संवर्धन समिती, सिद्धीविनायक ट्रस्ट, नाम फाऊंडेशन यासह स्थानिक विविध स्वयंसेवी संस्थांचाही समावेश आहे.
जिल्ह्यासाठीच्या विकास आराखड्यातील निधींचे काटेकोर नियोजन, तसेच पुरेपूर विनीयोग करतानाच जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी प्रशासनातील मानवी आस्थाही विविध उपक्रमानी वृद्धींगत केली आहे. यामध्ये वंचितासाठी अन्न सुरक्षा या उपक्रमास थेट राष्ट्रपती भवनातील सादरीकरणासाठी निमंत्रित कऱण्यात आले आणि त्याच्याविषयी कौतुकोद्गारही काढण्यात आले. प्रशासकीय रेट्यातही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी प्रचंड थंडीच्या दिवसात निराधारांना शालींचे वाटप, निराधार मुलींसाठी दंगल चित्रपट दाखविण्याचा उपक्रम यातून संवेदनशील प्रशासनाचा पायंडाही घालून दिला आहे. यासह विविध बाबींचा सर्वंकष विचार करून जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
पुरस्काराचे श्रेय नांदेड जिल्हावासीयांनाच - जिल्हाधिकारी काकाणी
नांदेड जिल्ह्याने नाविन्यपुर्ण उपक्रम राबविताना आपल्या पाठीशी सकारात्मक पाठबळ उभे केले, त्यामुळेच हा गौरव मिळू शकल्याची प्रतिक्रीया जिल्हाधिकारी श्री. काकाणी व्यक्त केली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणासाठी श्री. काकाणी सध्या मसूरी येथे आहेत. या पुरस्काराबाबत त्यांनी तेथून प्रतिक्रीया नोंदविली. ते म्हणाले की, या पुरस्काराचे श्रेय नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना, विविध पदाधिकारी, लोकप्रतिनीधी, सर्व विभागांचे प्रमुख, महसूल आदी विभागांचे अधिकारी-कर्मचारी सहकाऱ्यांना आहे. माझ्यासह हा गौरव नांदेड जिल्हावासियांचाच आहे, असे मी मानतो.

000000

No comments:

Post a Comment

 शासकीय लेखनसामुग्री व ग्रंथागार 22 ते 26 एप्रिल या कालावधीत बंद छत्रपती संभाजीनगर, दि. 18 (विमाका): शासकीय लेखनसामुग्री व ग्रंथागार, छत्रपत...