Wednesday, January 25, 2017

राष्ट्र  उभारणीत रचनात्मक योगदानासाठी
तरुणांनी कटीबद्ध रहावे - पालकमंत्री खोतकर
प्रजासत्ताकदिनाचा मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा दिमाखदार समारंभ

नांदेड, दि. 26 :- राष्ट्र आणि राज्याच्या सकारात्मक आणि रचनात्मक उभारणीसाठी कटीबद्ध व्हावे लागेल असे सांगतानाच त्यासाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि तरुणांची शक्ती यांचा समन्वय साधणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर यांनी आज येथे केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात ते शुभेच्छापर संदेशात बोलत होते.

पोलीस कवायत मैदानावर झालेल्या या समारंभात पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. शानदार संचलन आणि पोलीस दलाच्या जलद कृती दलाच्या थरारक प्रात्यक्षिकांमुळे समारंभ दिमाखदार झाला. समारंभास जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. मंगलाताई गुंडले, महापौर शैलजा स्वामी, आमदार हेमंत पाटील, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आदींची तसेच व्यासपीठावर जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांची उपस्थिती होती.
शुभेच्छापर संदेशात बोलताना पालकमंत्री खोतकर पुढे म्हणाले की, येणाऱ्या काळात, पुढच्या पिढ्यांमध्ये राष्ट्राभिमान द्विगणीत होईल, यासाठी प्रयत्न करावे लागतील. राष्ट्र आणि राज्याची वाटचाल प्रगतशील आहे. या वाटचालीत तरुण होतकरूंची संख्या बलस्थान आहे. त्यामुळे या तरुण लोकसंख्येचा आपल्याला खुबीने आणि प्रभावशाली उपयोग करावा लागेल. तरुणांच्या शक्तींचा वापर सकारात्मक दृष्टीने करावा लागेल. जुन्या जाणत्यांचा अभ्यास आणि नव तरुणाईचा जोष यांची सांगड घालणे आवश्यक आहे. यासाठी तरुणांनाही आव्हानांना गवसणी घालावी लागेल. नव तंत्रज्ज्ञान आत्मसात करतानाच, राष्ट्राच्या-राज्याच्या विकासासाठी शिक्षण-संशोधनाच्या क्षेत्रांना पादाक्रांत करावे लागेल.
मनन-चिंतन आणि मनगटाच्या बळावर या देशाच्या विकासात भर घालण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी जग ते स्थानिक पातळीवरील परिस्थितीचे भान राखून सकारात्मक आणि रचनात्मक उभारणीसाठी कटीबद्ध व्हावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री खोतकर यांनी यांनी उपस्थित जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी यांच्याशी संवाद साधून त्यांची आस्थेवाईक विचारपूसही केली. तसेच लोकप्रतिनिधी आणि नागरिकांशीही हितगूज केले. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे आणि पोलीस निरीक्षक शामराव राठोड यांच्या नेतृत्वात  विविध दलांनी शानदार संचलनाने मानवंदनाही दिली. या संचलनात मुदखेडच्या केंद्रीय राखीव पोलीस दल, हिंगोलीतील राज्य राखीव पोलीस दल, नांदेड पोलिसांचे जलद कृती दल (क्युआरटी), सशस्त्र पोलीस पथक, नांदेड पोलीस मुख्यालयाचे पथक तसेच नांदेडचे सशस्त्र महिला व सशस्त्र पोलीसांचे पथक, शहर वाहतूक शाखा, नांदेड, गृह रक्षक दलाचे महिलांचे व पुरूषांचे पथक, नांदेड महापालिकेचे अग्नीशमन दल पथक, यशवंत महाविद्यालयाचे राष्ट्रीच छात्रसेनेचे पथक, महात्मा फुले हायस्कुलचे मुलांचे व मुलींचे स्काऊट गाईड पथक, ग्यानमाता विद्यालय, पोतदार विद्यालय, नागार्जूना हायस्कुल, ऑक्सफोर्ड विद्यालयांच्या या चार शाळांतून आलेले मुला व मुलींचे पथक, पोलीस वाद्यवृंद पथक, जलद कृती दलाच्या बुलेटस्वारांचे पथक, सिमा या श्वानासह असलेले पथक, बॅाम्ब शोधक व नाशक पथक, मार्कस मॅन, न्याय वैधक शाळेचे पथक, वज्र वाहन, अग्नीशमन दलाचे बुलेटस्वारांचे पथक यांनी शानदार संचलन केले. या संचलनात वन विभागाच्या जलद सुटका पथक, सामाजिक वनीकरण विभागाची हरितसेना, तसेच 108 रुग्णवाहिकेचे पथक यांनी चित्ररथाद्वारे सहभाग घेतला.  
यावेळी पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते स्काऊट गाईडसाठीचे राष्ट्रपती महोदयांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ स्वप्नील भंगाळे (राजर्षी शाहू विद्यालय, नांदेड), सैलीनी शेख, सागर बोरगावे, पवन पटणे ( सर्व बसवेश्र्वर विद्यालय, फुलवळ, ता. कंधार ), शारदा करेवार ( महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शेकापूर, ता. कंधार ) यांना प्रदान करण्यात आले. यावेळी नांदेड पोलिस दलाच्यावतीने कराटेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.  विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक कवायत, डंबेल्स, घुंगर काठी, लेझीम, यांची प्रात्यक्षिके सादर केली. नांदेडच्या जलद कृती दलाच्यावतीनेही अपहरणातील सुटकेवर आधारीत चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते वन विभाग, नांदेड तहसीलच्या पुरवठा विभाग, पशूसंवर्धन विभाग तसेच रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने शहर वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या प्रदर्शन दालनांचेही उद्घाटन करण्यात आले. समारंभाचे व्यंकटेश चौधरी यांनी सुत्रसंचलन केले. समारंभास नांदेड शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरीकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000000

No comments:

Post a Comment

  वृत्‍त क्र.   36 6 एमएच-सीईटी परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   नांदेड , दि.   19   : - एमएच-सीईटी परीक्षा-2024     ही 2...