Tuesday, December 13, 2016

रविवारी अल्पसंख्यांक हक्क दिन   
नांदेड, दि. 13 :-  महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडून रविवार 18 डिसेंबर 2016 हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून साजरा करण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.
हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, समाजसेवक, जिल्हा अल्पसंख्यांक कल्याण समितीचे सदस्य, मोहल्ला समित्या, सर्व पोलीस स्टेशन, आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करावेत. कार्यक्रमामध्ये अल्पसंख्यांकाचे हक्क, घटनेद्वारे अल्पसंख्यांकांना असलेले अधिकार देशाच्या अखंडतेसाठी आणि विकासासाठी असलेली सामाजिक सद्भावनेची गरज आणि अल्पसंख्यांकांची राष्ट्रीय विकासाच्या मुख्य प्रवाहातील समावेशाची आवश्यकता या बाबीवर समाजाच्या सर्व घटकामध्ये जागृती करावी. विशेषत: जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत तहसीलदार, गटविकास अधिकारी व इतर कार्यालयांच्या सहकार्याने कार्यक्रम आयोजित करावा, असे जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयाकडून निर्देशीत करण्यात आले आहे.

0000000
जिल्हा कारागृहात मानवी हक्क दिन साजरा
                नांदेड दि. 13 :- मानवी हक्क दिन 10 डिसेंबर हा जिल्हा कारागृह नांदेड येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे नुकताच पार पडला. कार्यक्रमास जिल्हा कारागृहातील सर्व बंदी व विधिज्ञ तसेच अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए. आर. कुरेशी उपस्थित होते.
                श्री. कुरेशी यांनी मानवी हक्काबद्दल भारतीय संविधानात नमुद केलेले मुलभुत हक्क, कर्तव्य, तसेच महाराष्ट्र राज्य मानवी हक्क अधिनियम यासंबंधी माहिती देऊन प्रत्येक नागरिकांनी आपले मुलभुत हक्काबद्दल जागरुक रहायला पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.
                न्यायदंडाधिकरी श्री. सोरते, अॅड. प्रविण अयाचित, अॅड. राणा सारडा, अॅड. विशाखा जाधव, अॅड. क्रांतीकुमार शर्मा, खमर चाऊस, सामाजिक कार्यकर्ता यांनी मानवी हक्काबद्दल माहिती दिली. तसेच बंदींचे अधिकाराविषयी मार्गदर्शन केले.        जिल्हा कारागृह अधिक्षक गोविंदराव राठोड यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन, आभार अॅड. अयाचित यांनी मानले.

0000000
माजी सैनिक, कुटुंबियांना
गुरुवारी विशेष गौरव पुरस्कार
नांदेड, दि. 13 :- सैनिक कल्याण विभाग दरवर्षी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करुन महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार गुरुवार 15 डिसेंबर 2016 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे होणाऱ्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम व माजी सैनिकांच्या मेळाव्यात जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सर्व माजी सैनिक, विधवा यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व्ही. व्ही. पटवारी यांनी केले आहे. 
विशेष गौरव पुरस्कार 10 हजार रुपये रोख व प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात येते. सैनिक कल्याण विभाग दरवर्षी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करुन महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार दिला जातो. यामध्ये राज्यस्तरावर अर्ज मागवून माजी सैनिकांची निवड केली जाते. यावर्षी शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या पाल्यांची निवड केली गेली आहे. यामध्ये क्रिडा क्षेत्रामध्ये औरंगाबाद विभागात माजी सैनिकाचे पाल्य राहूल तुकाराम मसीदवार यांनी च्वॉय क्यांदो स्पर्धेत माजी सैनिकातून पहिल्या पाच पाल्यामध्ये आल्याने त्यांची विशेष गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

00000
सशस्‍त्र सेना ध्‍वजदिन निधीच्‍या 
संकलन प्रारंभाचा गुरुवारी कार्यक्रम
नांदेड दि. 13 :- सशस्त्र सेनादल ध्वजदिन निधी संकलन प्रारंभ व माजी सैनिक, विधवा मेळाव्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार 15 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे होणार आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी कळवले आहे. 
या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक संजय येनुपुरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून युद्धविधवांचा सत्कार, माजी सैनिकांना गौरव पुरस्कार, शिष्यवृत्ती वाटप व इतर आर्थिक मदतीचे धनादेश वाटप होणार आहेत. तसेच ध्वजदिन निधी संकलन 2015 मध्ये उत्कृष्ट संकलन करणाऱ्या कार्यालय प्रमुखांना प्रशस्तीपत्र देऊन बक्षीस वितरण होणार आहे. जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, विधवा यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000
इंग्रजी माध्यमाच्या आदिवासी निवासी शाळा
 प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 13 :- इंग्रजी माध्यमाच्या आदिवासी एकलव्य रेसिडेन्शीयल पब्लीक स्कुलमध्ये प्रवेशासाठी सर्व शाळेतील मुख्याध्यापक व पालकांनी प्रवेश परीक्षाचे अर्ज पत्रविहीत मुदतीत सादर करावे. विहित नमुन्यातील अर्ज संबंधीत शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक यांचे कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहेत. अर्ज मंगळवार 31 जानेवारी 2017 पर्यंत संबंधित कार्यालयाकडे मुख्याध्यापकामार्फत सादर करावीत, असे आवाहन किनवटचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
इंग्रजी माध्यमाच्या आदिवासी एकलव्य रेसिडेन्शीयल पब्लीक स्कुलमध्ये प्रवेशासाठी रविवार 5 मार्च 2017 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 यावेळेत आयोजित स्पर्धा परीक्षा करीता अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती यांचे अधिनस्त येत असलेल्या प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या नांदेड जिल्ह्यातील शासकीय , अनुदानीत आश्रमशाळा तसेच जिल्हा परिषद प्राथमिक व इतर शासनमान्य प्राथमिक शाळेतील सन 2016-17 मध्ये इयत्ता 5वीमध्ये शिक्षण घेत असलेले परंतू ज्या पालकांचे वार्षिक सरासरी उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा कमी आहे अशाच विद्यार्थी परिक्षेसाठी पात्र राहतील, असेही कळविले आहे.

0000000