Sunday, October 2, 2016

कृपया सोबतच्या वृत्तास आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्धी दयावी ही विनंती. - जिल्हा माहिती कार्यालय नांदेड

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शनातून उमटले राज्याच्या विकासाचे प्रतिबिंब
-         मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार
मुंबई, दि. 2 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित केलेल्या महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शनातून बदलत्या महाराष्ट्राचे प्रतिबिंब उमटले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.
प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या कलादालनात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन व स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंह,  ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, या छायाचित्र प्रदर्शनात मांडण्यात आलेली सर्व छायाचित्रे अत्यंत सुंदर आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने चांगली संकल्पना प्रत्यक्षात आणली. राज्यात दोन वर्षात घडलेल्या परिवर्तनाचे प्रतिबिंब या छायाचित्रांमधून उमटले आहे. एखादी गोष्ट प्रत्यक्ष बघितल्याशिवाय विश्वास बसत नाही अशा वेळी छायचित्र ही महत्वाची भूमिका बजावत असतात, असे सांगून ते पुढे म्हणाले की, छायचित्रकला ही नैसर्गिक स्वरूपात अभिव्यक्त होण्याचे माध्यम आहे. एका छायाचित्रातच हजार शब्दांचा आशय सामावलेला असतो. माध्यमांमध्ये छायाचित्रांशिवाय बातमीला महत्व नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी छायाचित्रकारांचा गौरव केला.
प्रदर्शनातील छायाचित्रांमधून मेक इन महाराष्ट्र, जलयुक्त शिवार, स्मार्ट सिटी अशा विविध शासकीय योजनांच्या यशाचे प्रतिबिंब उमटले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील गड किल्ले, कला, संस्कृती, वन्यजीव, बहुविविधतेचे आणि एकात्मतेचे दर्शनही होत आहे. या प्रदर्शनातील छायाचित्रांचा समावेश असलेले कॉफी टेबल बूक तयार करावे. राज्यात येणाऱ्या परदेशी शिष्टमंडळांना हे पुस्तक सचित्र महाराष्ट्राचा ठेवा म्हणून भेट देता येईल, दरवर्षी अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंह यावेळी म्हणाले की, लोकांच्या नजरेतला महाराष्ट्र या छायाचित्रांच्या माध्यमातून दिसत असून प्रत्येक छायाचित्र आपली एक वेगळी कथा आहे. दोन वर्षांतील राज्याची प्रगती आणि जनतेमधील चैतन्य, राज्याचे प्रतिमा संवर्धन या छायाचित्रांमधून होत आहे. या सर्व छायाचित्रांचा समावेश असलेले कॉफी टेबल बुक तयार करण्यात येईल. प्रदर्शनासाठी राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे 3800 छायाचित्रे प्राप्त झाली. दरवर्षी अशा प्रकारची स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येईल, असेही त्यांनी प्रास्ताविकपर भाषणात सांगितले.
छायाचित्र हे समाजाचे दस्तावेज असून नवीन पिढीसाठी इतिहास सांगण्याचे काम ते करीत असतात. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांचे यश या छायचित्रांमधून दिसत आहे, असे श्री. ओलवे यांनी यावेळी सांगितले.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून छायाचित्रकारांना राजाश्रय मिळाल्याची भावना प्रथम क्रमांक विजेते देवदत्त कशाळीकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
यावेळी छायाचित्र स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेते देवदत्त कशाळीकर, द्वितीय क्रमांकाचे विजेते विद्याधर राणे, तृतीय क्रमांकाचे विजेते दिनेश भडसाळे  यांना अनुक्रमे पंधरा हजार, दहा हजार व पाच हजार रुपयांचा धनादेश आणि प्रमाणपत्र देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ बक्षिस विजेते सचिन मोहिते, अशोक पाटील, चंद्रकांत पाटील, शरद पाटील, सतिश काळे यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा धनादेश, प्रमाणपत्र देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
छायाचित्र स्पर्धेचे परिक्षक श्री. ओलवे, गॅझेटर्स विभागाचे कार्यकारी संपादक डॉ. दिलीप बलसेकर, पीआयबीचे मुख्य फोटो अधिकारी अख्तर सईद, माध्यम तज्ज्ञ आशुतोष पाटील यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. प्रदर्शनाच्या ठिकाणी मांडण्यात आलेल्या लोकराज्य अंकाच्या स्टॉलला मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी भेट दिली.
या कार्यक्रमास संचालक अजय अंबेकर, संचालक देवेंद्र भुजबळ, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रा. ना. मुसळे, पुरस्कार विजेत्यांचे कुटुंबिय यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. संचालक शिवाजी मानकर यांनी आभार मानले. पल्लवी मुजुमदार यांनी सत्रसंचालन केले. दि. 5 ऑक्टोबर 2016 पर्यंत हे प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत सर्वांसाठी  खुले राहणार आहे.
0000000

अजय जाधव..2.10.2016
जिल्ह्यात हंगामात 107.92 टक्के पाऊस
गत 24 तासात सरासरी 9.65 मि.मी. 
           नांदेड, दि. 3 :- जिल्ह्यात  सोमवार 3 ऑक्टोंबर 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 154.45 मिलीमीटर पाऊस  झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 9.65 मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 1031.19 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.   
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुका निहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्या क्रमाने ) लोहा-149.79, नांदेड-127.81, अर्धापूर-127.11, भोकर-123.47, कंधार-120.87, मुखेड-119.51, हदगाव-110.40, बिलोली-109.29, नायगाव-103.71, मुदखेड-99.82,  माहूर-99.48, धर्माबाद-96.04, हिमायतनगर-93.38, देगलूर-91.86, उमरी-91.49, किनवट-81.64. जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची टक्केवारी  107.92 इतकी झाली आहे.    
जिल्ह्यात सोमवार 3 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात  झालेला  पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय  पुढीलप्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 17.00 (1165.53), मुदखेड- 35.33 (852.02), अर्धापूर-19.33 (1105.33), भोकर-29.50 (1230.25), उमरी-6.67 (911.60), कंधार-निरंक (974.97), लोहा-5.00 (1248.17), किनवट-5.00 (1012.32), माहूर-2.25 (1233.50), हदगाव-17.71 (1078.98), हिमायतनगर-11.33 (912.64), देगलूर-3.33 (827.00), बिलोली-निरंक (1058.00), धर्माबाद-निरंक (879.38), नायगाव-2.00 (949.54), मुखेड-निरंक (1059.85) आज  अखेर  पावसाची सरासरी 1031.19 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 16499.08) मिलीमीटर आहे. 

00000
पूर परिस्थितीत अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन 
नांदेड, दि. 2 :- बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या मांजरा पाणलोट क्षेत्रात आज  झालेल्या अतिवृष्टीमुळे धोकादायक पूर परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात व या नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी अतिसर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
पावसामुळे पाण्याची आवक वाढत असल्याने आणि 95 ते 100 टक्के जलसाठा निर्माण झाल्यास नांदेड जिल्ह्यातील इतर प्रमुख बंधाऱ्यातून अतिरिक्त जलसाठा वेळोवेळी विसर्ग करण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व नदी-नाल्या काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे सूचित करण्यात येत आहे. नागरिकांनी अशा धोकादायक ठिकाणी जाण्याचे टाळावे. मदत व तातडीच्या काळात स्थानीक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. पूर नियंत्रणासाठी सिंचन भवन नांदेड येथे 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित असून त्याचा दूरध्वनी क्रमांक 02462-263870 असा आहे, याची नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

0000000
 बिलोली बोळेगाव परिसरात पुरात अडकलेल्यांच्या
सुटकेसाठी अग्निशमन दल , एनडीआरफकडून मोहीम
मांजरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
नांदेड, दि. 2 :- बिलोली तालुक्यातील बोळेगाव येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्यांच्या सुटकेसाठी राबविण्यात येत असलेली मोहीम सायंकाळी थांबविण्यात आली. प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर मांजरा नदीच्या पात्रात अडकलेल्या काही व्यक्तींच्या सुटकेसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि महापालिकेच्या अग्निशमन दल यांच्याकडून ही मोहीम राबविण्यात येत होती. मोहिमेत नदी पात्रात दूरवर जाऊन शोध घेण्यात आला. यांत्रिकी बोटी आणि प्रकाश झोतातही पुराच्या पाण्यात व्यक्तींचा किंवा अन्य ठावठिकाणा न लागल्याने सायंकाळी मोहीम थांबविण्यात आली. आवश्यकता भासल्यास उद्या दिवसाच्या प्रहरात पुन्हा शोधमोहिम राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. याबाबत नदी प्रवाहाच्या पुढील नियंत्रण कक्षांनाही सतर्क करण्यात आले आहे. तेलंगणातील संबंधीत यंत्रणानाही माहिती देण्यात आली आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थान प्रतिसाद दलाचे पथक बोळेगाव येथे कार्यरत असून, या पथकाचा तळ नरसी येथे ठेवण्यात येणार आहे. यांत्रिकी बोटीसह, आपत्ती व्यवस्थानाच्या साधनसामुग्रीने सज्ज हे पथक पुढील काही दिवस नांदेड जिल्ह्यातच राहणार आहे.
मांजरा नदीच्या पाणी पातळीत बीड जिल्ह्यातील धरणातून सुरु असलेल्या विसर्गामुळे वाढ होण्याची शक्यता असल्याने नदी काठच्या गावांना आणि सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे. नागरिकांनी पुराच्या पाण्यात जाऊ नये, नदी पात्राशी लगत भागांनी अधीक सतर्कता बाळगावी, तसेच अफवावंवर विश्वास न ठेवता, अडचणी व मदतीसाठी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
 जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीवर जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत यंत्रणा आज दिवसभरही पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कार्यरत होत्या. तसेच जिल्‍हयातील देगलूर, मुखेड, कंधार व बिलोली तालुक्‍यातील 32 गावे पुराच्‍या प्रवाहात येत असल्‍याचे निदर्शनास आल्‍याने त्‍या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देऊन एकूण 7 ठिकाणी त्‍यांची तात्‍पुरत्‍या रहाण्‍याची व्‍यवस्‍था करून खबरदारीची उपाययोजना करण्‍यात आली होती. पण आता पुराचे पाणी हळूहळू ओसरल्‍याने या लोक पुर्ववत त्यांच्या घराकडे परतत असल्याचीही माहिती, प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.     
पुराच्या पाण्यामुळे आतापर्यंत सहा जण दगावल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली आहे. नदी काठच्या शेत जमिनीचे आणि पिकांचेही नुकसान झाले आहे, त्याचीही माहिती एकत्रित करण्यात येत आहे. याबाबत राज्यस्तरावरील यंत्रणा तसेच विभागीय आयुक्तालय यांना वेळोवेळी अहवाल पाठविण्यात येत आहे.

000000
राष्ट्रपुरूषांच्या विचारांवर कृती करण्यातूनच
त्यांना खरी आदरांजली - जिल्हाधिकारी काकाणी
महात्मा गांधी, माजी पंतप्रधान शास्त्री यांना जयंती दिनी अभिवादन

नांदेड, दि. 2 :- राष्ट्रपुरूषांच्या विचारांवर, आदर्शावर, कर्तव्यावर प्रत्यक्ष कृती करण्याने त्यांच्या स्वप्नातील भारत साकारता येईल, असे विचार जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे व्यक्त केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमात स्वच्छता अभियानाची शपथही उपस्थितांना देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील बचत भवन येथे कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी श्रीमती ढालकरी, जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. थोरात, अप्पर कोषागार अधिकारी एन. पी. पाचंगे, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी आदींची उपस्थिती होती.
श्री. काकाणी पुढे म्हणाले की, महान राष्ट्रीय पुरूषांच्या विचारावर कृती करणे ही काळाची गरज आहे. विशेषतः संघटीत क्षेत्रावर त्यांच्या विचारांवर कर्तव्य म्हणून काम करणे आवश्यक आहे. असंघटीत आणि गोरगरीब, सामान्य जनतेच्या हितासाठी कार्यरत रहाणे ही या राष्ट्रीय पुरुषांना खरी आदरांजली ठरेल. त्यासाठी आपली शक्ती सकारात्मक कामांसाठी वापरावी लागेल. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूरशास्त्री यांचे जीवन हाच एक मोठा संदेश आहे.
सुरवातीला महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील, तसेच अप्पर कोषागार अधिकारी श्री. पाचंगे यांची समयोचित  भाषणेही  झाली.  निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांनी सुत्रसंचलन केले व आभार मानले. कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000000