Monday, September 26, 2016

मानार नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन
नांदेड, दि. 26 :- मानार नदीकाठच्या जनतेने सतर्क राहून आपल्या पशुधनाची व मालमत्तेच्या सुरक्षिततेची उपाय योजना करावी, असे आवाहन नांदेड पाटबंधारे उत्तर विभाग कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की , उर्ध्व मानार प्रकल्प लिंबोटीमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यामुळे धरणाची क्षमता लक्षात घेऊन आश्यकतेनुसार पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे लिंबोटी, डोंगरगाव, हनमंतवाडी, चोंडी, दगडसांगवी, मजरेसांगवी, बोरी खु, उंबरज, संगमवाडी, कोल्हाची वाडी, शेकापूर, अंबेवाडी, जंमलवाडी, बाळंतवाडी व घोडज या नदीकाठच्या गावातील नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टिने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लिंबोटी धरणाचे जलाशय खोल असल्याने या जलाशयात कोणीही पोहण्यास जावू नये असेही निवेदनात म्हटले आहे.

000000
विधानसभा विरोधी पक्षनेता
राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा
नांदेड, दि. 26 :-  राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 30 सप्टेंबर 2016 रोजी औरंगाबाद विमानतळ येथून खाजगी विमानाने नांदेड विमानतळ येथे सकाळी 11 वा. आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी 11.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वा. स्व. प्राचार्य डॉ. गो. रा. म्हैसेकर यांच्या निवासस्थानी भेट. दुपारी 12.30 वा. वर्कशॉप कॉर्नर येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. दुपारी 12.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायंकाळी 4 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने माहूर जि. नांदेडकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6.30 वा. शासकीय विश्रामगृह माहूर येथे आगमन, राखीव व मुक्काम.
निवार 1 ऑक्टोंबर 2016 रोजी सकाळी 10 वा. शासकीय विश्रामगृह माहूर येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 12.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून नांदेड विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 1 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व खाजगी विमानाने पुणेकडे प्रयाण करतील.

000000
जिल्हाधिकारी काकाणी यांच्या नेतृत्वात
पूर नियंत्रणासाठी शर्थीचे प्रयत्न
क्षणा-क्षणाच्या संवाद-संपर्क-समन्वयावर भर

नांदेड, दि. 26 :-  संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नदी असणाऱ्या गोदावरीच्या पाणी पातळीवर जिल्हा प्रशासनाकडून क्षणा-क्षणाला  नजर ठेवली जाते आहे. नदीकाठच्या  परिसराला पुराच्या पाण्याचा फटका बसू नये यासाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी  आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सातत्यपुर्ण संपर्क ठेवला आहे. विशेषतः पोचमपाड या तेलंगणा राज्यातील धरणातून वेळीच पाण्याचा विसर्ग करण्यात यावा यासाठी जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी केलेल्या प्रयत्नामुळे संभाव्य हानी टाळता आली आहे. पूर नियंत्रणासाठी क्षणा-क्षणाला समन्वय राखला जात आहे.
Add caption
तरीही सखल भागातील रहिवाशी आणि पुररेषेतील घटकांनी विशेष सतर्कता बाळगावी. आगामी काळातही पावसाचा जोर वाढल्यास जनतेने अधिक सजग रहावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी केले आहे. हवामान खात्याच्या सलग 5 दिवस पावसाचा जोर राहील या इशाऱ्याच्या अनुषंगाने हे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काही दिवस कसोटीचे राहणार आहेत.
            गोदावरी नदीवरील विष्णुपूरी हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील पाणीसाठा स्थिर ठेवण्याबरोबरच, पुढे पाणी सोडण्याने होणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागातील संपर्क-समन्वय उपयुक्त ठरला आहे. जिल्हाधिकारी श्री. काकाणी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बी. एस. स्वामी तसेच अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी आणि कार्यकारी अभियंता एम. टी. लव्हराळे, उपअभियंता निलकंठ गव्हाणे यांच्यासह विविध प्रकल्पांवरील अभियंता, अधिकारी-कर्मचारी यांचे सांघिक प्रयत्न महत्त्वपुर्ण ठरले आहेत.
            विष्णुपूरी प्रकल्पाच्या पाण्याचा थेट नांदेड शहर आणि पुढे नदीकाठच्या गावांवर प्रभाव पडतो. त्यामुळे प्रकल्पात परभणी, बीड, जालना जिल्ह्यातून येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा विचार करावा लागला. या जिल्ह्यातील प्रकल्प अतिवृष्टीमुळे  पूर्ण भरल्याने तेथून होणारा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात समावून घेता यावे यासाठी नदीपात्राची जलधारण क्षमता विचारात घेवून पाण्याचा विसर्ग करण्याचे नियोजन करण्यात आले. विष्णुपुरी प्रकल्पाची जलग्रहण क्षमता आणि तेथून पुढे सोडावयाच्या पाण्याबाबत ताळमेळ घालण्यात आला. नदी पात्रातील पाणी अन्य नाले आणि ओढ्यांना, छोट्या नद्यांचे पाणी सामावून घेऊ शकत नसल्याचा अंदाज आल्याने तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरणातील पाणी वेळीच पुढे सोडण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी निजामाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी योगिता राणा यांच्यासह तेथील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजावून दिले. त्यामुळे पोचमपाडमधून वेळीच विसर्ग सुरु झाल्याने, पाणी पुढे सरकण्यास वाव मिळाला. दुसरीकडे विष्णपुरीतील पाण्याचा वेगही नियंत्रित करण्यात येत आहे. त्यासाठी कधी दहा, कधी आठ तर कधी सहा दरवाजे उघडे ठेवण्यात येत आहे. या नियंत्रीत प्रयत्नामुळे सखल भागात पाणी शिरुन होणारे संभाव्य नुकसान टाळण्यात आले. नागरिकांना इतरत्र हलवण्याची वेळे येऊ नये. त्याचबरोबर शेतीचे नुकसान होऊ नये अशा पद्धतीने पाण्याचा विसर्ग नियंत्रीत करण्यात येत आहे.  
प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करताना, वेळेचाही प्रामुख्याने विचार करण्यात येत आहे. रात्री-अपरात्री पाणी सोडण्याऐवजी नदीकाठच्या गावांना आणि रहिवाश्यांना हालचाली करणे सोयीचे व्हावे, तसेच त्यांच्यापर्यंत पोहचून, त्यांना मदत करता यावी यासाठी दिवसाच्या प्रहरातच मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. याशिवाय नदीकाठच्या गावातील आपत्ती व्यवस्थापन समित्यांनाही वेळीच सतर्क करण्याची खबरदारी घेण्यात येत आहे. त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्यात आला आहे. याशिवाय आरोग्य आणि पोलिस प्रशासन अशा विविध यंत्रणांनाही सतर्क राहण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.       
नियंत्रण कक्षांचे दूरध्वनी क्रमांक
            दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांनी विशेषतः नदीकाठची गावे, वस्त्या-रहीवाशी शेतकऱ्यांनी सतर्क रहावे, अफवांवर विश्र्वास न ठेवता जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. त्यासाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. हे क्रमांक असे जिल्हाधिकारी कार्यालय  नियंत्रण कक्ष- 02462-235077, नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक (टोल फ्री)- 1077, महानगरपालिका नियंत्रण कक्ष- 02462 234461, पोलीस नियंत्रण कक्ष- 02462 234720, आरोग्य विभाग- 02462 236699, नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक (टोल फ्री)- 108.
जलयुक्त शिवार अभियानातील
जलसाठ्यांबाबत दक्षता घेण्याचेही आवाहन
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे जलसाठे निर्माण झाले आहेत. नदी, नाल्यांच्या खोलीकरण-रुंदीकरण-सरळीकरणामुळे अतिवृष्टीसारखी गंभीर परिस्थिती निर्माण होऊनही शेत जमिनींचे नुकसान टाळता आले आहे. निर्माण झालेल्या जलसाठ्यांच्याबाबत स्थानिक नागरिकांनी दक्षता घ्यावी, लहान मुले, महिला तसेच जनावरांच्याबाबत होणाऱ्या अपघाताच्या घटना टाळण्यासाठी विशेषत दक्षता घ्यावी, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
पाण्याची आवक आणि विसर्ग यांच्या समतोलाचे आव्हान
गोदावरी नदीत येणाऱ्या पाण्याची आवक आणि पुढे विष्णुपूरीसह, आमदुरा, बळेगावातून सोडण्याच्या पाण्याचा समतोल राखण्याचे आव्हान आहे. तेलंगणातील धरणातून चार लाख क्युसेक्सने विसर्ग सुरु ठेवण्याचा आग्रह धरण्यात आला आहे. विष्णुपूरी प्रकल्पातून आज दुपारच्या सुमारास आठ दरवाज्यांतून एक लाख 3 हजार क्युसेक्सचा विसर्ग सुरु होता. हा विसर्गही बारकाईने नियंत्रित करण्यात येत आहे. नांदेड शहरासह, लगतच्या भागातील पाणी पातळी धोक्याच्या पातळीवर जाणार नाही यासाठी संपर्क आणि समन्वय राखण्यात येत आहे. तासा-तासाला माहिती अद्ययावत करण्यात येत आहे. एकमेकांशी संपर्क आणि संवाद साधण्यावर भर देण्यात येत आहे.
000000
जिल्ह्यात हंगामात 99.41 टक्के पाऊस
गत 24 तासात सरासरी 16.54 मि.मी. 
           नांदेड, दि. 26 :- जिल्ह्यात  सोमवार 26 सप्टेंबर 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 264.59 मिलीमीटर पाऊस  झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 16.54 मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 949.95 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.   
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुका निहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्या क्रमाने ) लोहा-138.93, अर्धापूर-116.61, नांदेड-115.33, भोकर-111.48, कंधार-108.99, मुखेड-104.66, हदगाव-104.54, बिलोली-102.82, नायगाव-97.44, माहूर-94.66, धर्माबाद-89.56, हिमायतनगर-89.36, मुदखेड-88.57, उमरी-83.56, देगलूर-82.32, किनवट-76.74. जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची टक्केवारी  99.41 इतकी झाली आहे.    
जिल्ह्यात सोमवार 25 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात  झालेला  पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय  पुढीलप्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस  : नांदेड-41.38 (1051.65), मुदखेड- 8.67 (756.02), अर्धापूर-32.00 (1014.00) , भोकर-6.00 (1110.75), उमरी-9.33 (832.60), कंधार-33.83 (879.14), लोहा-43.17 (1157.67), किनवट-13.43 (951.60), माहूर-23.25 (1173.75), हदगाव-6.43 (1021.69), हिमायतनगर- निरंक (873.31), देगलूर-8.83 (741.17), बिलोली-8.40 (995.40), धर्माबाद-4.67 (820.05), नायगाव-5.20 (892.20), मुखेड-20.00 (928.14) आज  अखेर  पावसाची सरासरी 949.95  (चालू वर्षाचा एकूण पाऊस 15199.14) मिलीमीटर आहे. 
 00000