Friday, September 9, 2016

नांदेड आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी भिमराव शेळके यांची सहायक केंद्र संचालक या पदावर पदोन्नती झाल्यामुळे त्यांचा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांच्या हस्ते पुष्पहार, शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर शामकुंवर, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, डॉ. शिवाजी भोसले, डॉ. गणेश बनसोडे, वसंत मैय्या, छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी त्यांचे अभिनंदन केले. 

संवाद पर्व अभियानाद्वारे विविध योजनांचे
नांदेड आकाशवाणी केंद्रावरुन प्रसारण
नांदेड, दि. 9 :- जनतेला आनंद, उत्साह आणि ऊर्जा देणाऱ्या गणेशोत्सवाचा उपयोग सामाजिक जाणीव जागृती व प्रबोधनासाठी करता यावा यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने संवाद पर्व अभियान घेण्यात येत आहे. या अभियानात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, उपक्रम जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी नांदेड आकाशवाणी केंद्राच्या सहकार्याने विविध योजनांच्या माहितीवर मालिकेचे प्रसारण करण्यात येत आहे.
या संवाद पर्व अभियानांतर्गत शुक्रवार 9 सप्टेंबर 2016 रोजी सायंकाळी 6.30 वा. जलयुक्त शिवार योजनेसंबंधीत जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांची मुलाखत प्रसारीत होणार असून त्याचे पूर्नप्रसारण शनिवार 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9.10 मिनीटांनी होणार आहे. शनिवार 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वा. संवाद पर्व या विषयी चर्चासत्राचे प्रसारण होणार असून यामध्ये शिक्षणाविषयी उमाकांत जोशी, सामाजिक कार्यकर्ते वसंत मैय्या, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, आकाशवाणी केंद्राचे केंद्र संचालक भिमराव शेळके सहभाग घेणार आहेत. रविवार 11 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 वा. अवयवदान काळाची गरज या विषयावर शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर शामकुंवर, डॉ. शिवाजी भोसले, डॉ. रमेश बनसोडे हे माहिती देणार आहेत. या सर्व मुलाखती आकाशवाणीचे केंद्र संचालक श्री. शेळके यांनी घेतल्या आहेत.
या संवाद पर्व अभियानाच्या मालिकेत शासनाच्या विविध विकासाच्या योजना, उपक्रमांच्या माहितीचे प्रसारण होणार आहे. नागरिकांनी या मालिकेचा लाभ घ्यावा , असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी व नांदेड आकाशवाणी केंद्राचे केंद्र संचालक भिमराव शेळके यांनी केले आहे.   

000000
संवाद पर्व अभियानांतर्गत
आयुर्वेदीक महाविद्यालयात कार्यक्रम
नांदेड, दि. 9 :- श्री आयुर्वेदीक गणेश मंडळ व जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्यावतीने संवाद पर्व या अभियानांतर्गत रविवार 11 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 11  वा. बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संवाद पर्व या उपक्रमाच्या पार्श्वभुमीवर श्री आयुर्वेदीक गणेश मंडळ नांदेड यांच्या सहकार्याने हा जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित केला असून शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर शामकुंवर, डॉ. रमेश बनसोडे,  डॉ. शिवाजी भोसले, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी हे उपस्थित राहणार आहेत. सर्व अध्यापक, विद्यार्थी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. भास्कर शामकुंवर व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

000000