Thursday, December 15, 2016

ध्वजदिन निधी संकलनातून सैन्यदलाप्रती
कृतज्ज्ञता व्यक्त करण्याची संधी – जिल्हाधिकारी काकाणी
निधी संकलनास सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 15 :- ध्वजदिन निधी संकलनाचा उपक्रम म्हणजे भारतीय सैन्यदलाप्रती कृतज्ज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. त्यामुळे या निधीस विविध घटकांनी सढळ हाताने मदत करावी , असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे केले.

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2016-17 च्या संकलनाचा प्रारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री. काकाणी बोलत होते. नांदेड जिल्ह्यासाठीचे गतवर्षीचे निधी संकलनाचे उद्दीष्ट 108 टक्क्यांनी पुर्ण करण्यात आले आहे. त्यासाठी निधी संकलनात योगदान देणाऱ्या विविध कार्यालय प्रमुखांनाही यावेळी गौरवण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर व्ही. व्ही. पटवारी, मेजर बी. जे. थापा, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, प्रा. देवदत्त तुंगार यांच्यासह जिल्ह्यातील वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, सैनिकांचे नातेवाईक, नागरीक आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी माजी सैनिकांच्या मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की, सशस्त्र सेना ध्वजदिन निधी म्हणजे भारतीय सैन्यदलाप्रती कृतज्ज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. सशस्त्र ध्वजदिन निधी संकलनाचा आजचा हा दिवस म्हणजे सैन्यदलाबाबत समाजमनाला जागृत करण्याचा प्रयत्न आहे. नांदेड जिल्ह्यातून सैन्य भरतीत तरूणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे यासाठी नुकताच मोठ्या स्वरुपात नांदेड येथे सैन्य भरती मेळावा झाला. त्यासाठी विविध घटकांनी उत्कृष्ट योगदान दिल्याचेही श्री. काकाणी यांनी नमूद केले. तसेच सैन्य दलातील भरतीसाठी प्रशिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच जिल्ह्यात विविध घटकांच्या सहभागाद्वारे विशिष्ट असा कल्याण निधी उभारण्याचाही प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक श्री. येनपुरे म्हणाले की, महाराष्ट्राला थोर विरांची आणि शौर्याची परंपरा आहे. सीमेवर आणि अंतर्गत सुरक्षेसाठी महाराष्ट्रातील विरांनी अलौकीक असे बलिदान केले आहे. त्यांच्याप्रती आपल्याला सदैव कृतज्ज्ञता रहावे लागेल.
सुरुवातीला दिपप्रज्वलन करण्यात आले, तसेच अमर जवान प्रतिमेस पुष्पांजली वाहण्यात आली. त्यानंतर शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली, तसेच बिगूलच्या धुन वादनाद्वारे मानवंदनाही देण्यात आली. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर पटवारी यांनी प्रास्ताविक केले. जिल्ह्यातील शहीद वीर जवानांच्या वीरमाता, वीरपिता तसेच वीर पत्नींचा, कुटुंबियांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. माजी सैनिकांना तसेच त्यांच्या पाल्यांना शैक्षणीक शिष्यवृत्त्यांच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांचाही यावेळी पारितोषीक, प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. जिल्ह्यात ध्वजदिन निधीच्या संकलनाचे उद्दीष्ठ पुर्ण करणाऱ्या कार्यालय प्रमुखांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व प्रोत्साहनपर बक्षिसे प्रदान करण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी श्री. काकाणी आणि मान्यवरांच्या हस्ते ध्वजदिन निधींच्या ध्वजांचे वितरण करून, निधी संकलनासही प्रारंभ करण्यात आला. निधी संकलनाचे उद्दीष्ट पुर्ण केल्याबद्दल नांदेड जिल्ह्यासाठीचे प्रशस्तीपत्र व मानचिन्ह कॅप्टन पटवारी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांना सुपूर्द करण्यात आले. नायब तहसिलदार मकरंद दिवाकर यांनी सुत्रसंचालन केले. डी. पी. झगडे यांनी आभार मानले. जिल्हा सैनिक कल्याण संघटक कमलाकर शेटे व श्री. देशपांडे आदींनी कार्यक्रमांचे संयोजन केले. याप्रसंगी विविध कार्यालयांचे प्रमुख तसेच अधिकारी-कर्मचारी आदींचीही उपस्थिती होती.

000000

No comments:

Post a Comment

वृत्‍त क्र.   384   देगलूर तहसील कार्यालयासमोरील वाहतूक वळण रस्यात बदल   नांदेड दि. 24 एप्रिल- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने...