Tuesday, November 15, 2016

मतदारांना निर्भयपणे अधिकार बजाविण्यासाठी
यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे - डॉ. पाटील
विधान परिषद निवडणुकीसाठी प्रशिक्षण संपन्न

नांदेड , दि. 15 :- विधान परिषद निवडणुकीत मतदारांना निर्भयपणे मतदानाचा अधिकार बजाविता येईल, अशा रितीने निवडणूक कार्यक्रमाची अंमलबजावणी करा, असे निर्देश विधान परिषद नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाचे निवडणूक निरिक्षक डॅा. जगदीश पाटील यांनी आज येथे दिले. नांदेड विधान परिषद निवडणुकीसाठी शनिवार 19 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने निवडणूक यंत्रणेतील मतदान केंद्राध्यक्ष तसेच सुक्ष्म निरीक्षक अशा विविध अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आज संपन्न झाले. या प्रशिक्षणा दरम्यान डॅा. पाटील बोलत होते.
डॅा. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे संपन्न झालेल्या प्रशिक्षणास जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, सहायक जिल्हाधिकारी डॅा. राजेंद्र भारूड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे यांच्यासह उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, अनुराधा ढालकरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॅा. पाटील मार्गदर्शनात म्हणाले की, अन्य कोणत्याही निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीसाठीही अत्यंत पारदर्शीपणे कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात यावी. सुक्ष्म निरिक्षकांप्रमाणेच या निवडणुकीसाठी नियुक्त विविध पातळ्यांवरील अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे. मतदान केंद्रावरील व्यवस्थेबाबत काटेकोर नियोजन करण्यात यावे. मतदारांना निर्भयपणे मतदानाचा अधिकार बजाविता येईल, यासाठी विविध पातळ्यांवरील अधिकाऱ्यांनी समन्वय राखावा. अवैध बाबींवर तातडीने कारवाई करण्यासाठीही संपर्क-समनव्य राखण्यात यावा.
            जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी बैठकीत मतदान प्रक्रियेशी निगडीत विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. मतदान प्रक्रिया पुर्ण गोपनीय आहे. त्यामुळे या प्रक्रियेचे पावित्र्य राखण्यासाठी प्रयत्न करावेत. मतदाराला मतदान केंद्रात ओळखपत्राशिवाय कोणतीही गोष्ट बाळगता येणार नाही. मतदारांना मतदानासाठी सर्वोतोपरी मदत करतानाच, निवडणूक प्रक्रियेतील गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठीचे प्रशिक्षणही संपन्न
जिल्ह्यातील नऊ नगरपरिषद व दोन नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठीही अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे. त्याअनुषंगानेही जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती व त्या-त्या नगरपरिषदांसाठीचे निवडणूक निर्णय अधिकारी, सुक्ष्म-निरीक्षक यांचेही प्रशिक्षण संपन्न झाले.
त्यामध्येही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी निवडणूक कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी, आचारसंहितेचे काटेकोर पालन याबाबत निर्देश दिले. उपजिल्हाधिकारी श्री. कांबळे तसेच उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी, दिपाली मोतीयेळे यांनी निवडणूक प्रक्रियेतील विविध मुद्यांवर सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले.

----------

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   389   लोकसभा निवडणुकीसाठी आज नांदेड जिल् ‍ ह्यात मतदान   प्रशासन सज् ‍ ज ; मोठ्या संख् ‍ येने मतदान करण् ‍ याचे ...