Thursday, November 10, 2016

वैज्ञानिक संशोधनासाठीचे हवाई फुगे आढळल्यास
तात्काळ पोलीस, टपाल किंवा प्रशासनाशी संपर्क साधा
नांदेड, दि. 10 :- टाटा मुलभूत संशोधन संस्था ( टिआयएफआर ) हैद्राबाद यांच्यावतीने संशोधनासाठी हवाई फुगे प्रक्षेपित केले जाणार असून. असे हवाई-फुगे आढळल्यास जिल्ह्यातील नागरिकांनी जवळचे पोलीस स्थानक, टपाल कार्यालय किंवा प्रशासनाशी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा. फुगे किंवा त्याच्याशी संलग्न उपकरणे हाताळू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले आहे. याबाबत त्यांनी जिल्ह्यातील महसूल प्रशासन, पोलीस विविध घटकांनीही सतर्क रहावे असेही संबंधीत यंत्रणांना निर्देशित केले आहे.
टाटा मुलभूत संशोधन संस्था ( टिआयएफआर ) यांच्यामार्फत 15 नोव्हेंबर 2016 ते 30 एप्रिल 2017 या कालावधीमध्ये अंदाजे 10 हवाई-फुगे प्रक्षेपित केले जाणार आहेत. हे प्रक्षेपण रात्री 8 ते सकाळी 6.30 यावेळेत केले जाणार आहे. अशा हवाई-फुग्यांसोबत पाठविण्यात आलेली संशोधनासाठीची शासकीय उपकरणे पॅराशुटच्या साह्याने जमिनीवर येण्याची शक्यता आहे. हे पॅराशुट व उपकरणे आढळल्यास आल्यास ते आहे त्याच स्थितीत ठेवण्यात यावीत. ही उपकरणे लाकडी तसेच धातुच्या चौकटीत बंदीस्त करण्यात आली आहेत. ही उपकरणे आहे त्याच स्थितीत राहू द्यावीत. व त्याबाबत टाटा मुलभूत संशोधन संस्था ( टिआयएफआर ) हैद्राबाद, दुरध्वनी क्रमांक (040) 27123978, 27122505 किंवा 27130019 किंवा फॅक्स – (040) 27123327 या क्रमांकाशी किंवा जवळचे पोलीस स्थानक, टपाल कार्यालय, जिल्हा प्रशासनाशी संबंधित तलाठी, तहसील किंवा सक्षम अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. या फुग्यांशी संलग्न उपकरणांना हात लावू नये. यासंदर्भात माहिती देणाऱ्यास संबंधित संस्थेकडून माहिती देण्याचा खर्च व योग्य ते बक्षीस दिले जाणार आहे. या उपकरणावरही संपर्कासाठी पत्ता, दुरध्वनी क्रमांक, तार आदी माहिती देण्यात आली आहे. पण कोणत्याही परिस्थितीत उपकरणास हाताळले जाऊ नये. ते जोखमीचेही ठरू शकते. त्यामुळे वेळीच माहिती देणाऱ्यास, खर्चापोटीची रक्कम दिली जाईल. पण उपकरण उघडले असल्यास, किंवा हाताळले असल्यास मात्र खर्च-बक्षिस दिले जाणार नाही.
नोव्हेंबर महिन्याच्या तीसऱ्या आठवड्यापासून या प्रयोगात या फुग्यांचे प्रक्षेपण करणे सुरु होईल. हा एक वैज्ञानिक प्रयोग आहे. त्याबाबत विविध घटकांनी दखल घेऊन, ग्रामीण व सर्वदूर दुर्गम अशा परिसरातील नागरिकांनाही माहिती द्यावी, त्यांना असे फुगे व सोबत उपकरणे आढळल्यास नजीकच्या सक्षम शासकीय यंत्रणेशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन आवाहनही जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र. 283

  वृत्त क्र.   283 निवडणूक खर्च निरीक्षक नांदेडमध्ये दाखल ; खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आवाहन नांदेड, दि. 28 : लोकसभा निवडणूक ही अतिशय गं...