Saturday, October 1, 2016

डोंगरगाव मधील नागरिकांच्या सुटकेसाठी शर्थीचे  प्रयत्न सूरु
नागरीकांनी संयम बाळगावा , कोणत्याही धरणास धोका नाही
           नांदेड, दि. 1 :-  लिंबोटी  धरणाच्या  अचानक  आलेल्या पाण्यामुळे लोहा तालुक्यातील डोंगरगाव येथे शिवारात पुराच्या पाण्यात अडकलेल्या सुमारे 23 जणाच्या सुटकेसाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. या नागरिकांच्या सुटकेसाठी हवाई दलाच्या पश्चिम कंमाडकडून गुजरात येथील गांधीनगर येथूनही हेलिकॅाप्टर  बोलाविण्यात  आले आहे. पूरस्थितीबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. डोंगरगाव येथे मदतीसाठी लोहा, कंधार तहसीलमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह, नांदेड महापालिकेचे आपत्ती निवारण पथक तातडीने डोंगरगाव येथे पोहचली आहेत.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरआफ) चे पथकही रात्री याठिकाणी पोहचणार आहे. डोंगरगाव येथे सुटकेसाठी बोलाविण्यात आलेले हवाई दलाचे हेलीकॅाप्टर सायंकाळच्या अंधारामुळे आणि खराब हवामानामुळे परत गेले आहे. त्यामुळे तातडीने अन्य ठिकाणाहून म्हणजेच गुजरात गांधीनगर येथून हवाईदलाचे रात्रीही मदत आणि सुटकेसाठी काम करू शकणाऱ्या हेलिकॅाप्टर बोलाविण्यात आले आहे. तसेच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी तातडीने पोहचावे यासाठी समन्वय व संपर्क साधण्यात येत आहे.
आपत्ती व्यवस्थापनाशी  संबंधीत  यंत्रणा  डोंगरगाव येथे पुरात अडकलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. पाण्यात अडकलेल्यांनाही  धीर देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा स्तरावरूनही विविध प्रकारची मदत आणि सुटकेसाठीचे साहित्य तसेच साधनसामुग्री वेळेत पोहचेल यासाठी समन्वय साधण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यासाठी प्रत्यक्ष संपर्क साधून समन्वय करीत आहेत. याबाबत वरीष्ठ आणि आपत्ती व्यवस्थानासाठी मदत करू शकणाऱ्या राज्यस्तरीय यंत्रणाच्या वरीष्ठांशी वेळोवळी माहितीची देवाण-घेवाण केली जात आहे. अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी तसेच विविध स्तरावरील अधिकारी आपत्ती  व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध प्रयत्न करत आहेत.
लोहा तहसिलदार उषाकिरण श्रृंगारे, कंधारच्या तहसिलदार अरूणा संगेवार व अधिकारी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांची टीम डोंगरगाव येथे प्रत्यक्ष थांबून नागरिकांना धीर देत आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांच्यासह अन्य एका पथकही डोंगरगावकडे रवाना करण्यात येत आहे.
 00000



No comments:

Post a Comment

वृत्त क्र. 283

  वृत्त क्र.   283 निवडणूक खर्च निरीक्षक नांदेडमध्ये दाखल ; खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आवाहन नांदेड, दि. 28 : लोकसभा निवडणूक ही अतिशय गं...