Saturday, October 1, 2016

मुखेडमधील तरुणाची सूखरुप सुटका , डोंगरगाव मधील नागरिकांच्या सुटकेसाठी वेळेत पथक पोहचविण्यासाठी प्रयत्न

मुखेडमधील तरुणाची सूखरुप सुटका , डोंगरगाव मधील नागरिकांच्या सुटकेसाठी वेळेत पथक पोहचविण्यासाठी प्रयत्न
           नांदेड, दि. 1 :-  लिंबोटी  धरणाच्या  अचानक  आलेल्या पाण्यामुळे  लोहा तालुक्यातील डोंगरगाव येथे शिवारात सुमारे 23 जण अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी सुरु असलेल्या प्रयत्नांत आता लिंबोटीचे दरवाजे  बंद होऊ लागल्याने मदत कार्याला वेग आला आहे. दरम्यान, मुखेडमध्ये  कुंद्राळा तलावाच्या पाण्यात अडकलेल्या मारूती सोनपल्ले  या पंचवर्षीय तरुणाची सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे.
डोंगरगाव शिवारातील काही घरात नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. तर अन्य काही शेतातच अडकले आहेत. या सुमारे 23 जणांच्या सुटकेसाठीही मन्याडचे पाणी ओसरू लागल्याने मदत कार्यात वेग येऊ लागला आहे. नदीपात्राच्या दुसऱ्या बाजुने या पाण्यात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहचण्यात स्थानिक मदत पथक प्रयत्न करत आहे. त्यामध्येही यश येऊ लागले आहे.
बीडहून  रवाना झालेल्या  एनडीआरएफच्या पथकासह थेट घटनास्थळी पोहचण्यास निर्देशित करण्यात आले आहे. दरम्यान, डोंगरगाव येथील शिवारात आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक अशी प्रकाश व्यवस्था (लाईट टॅावर) तसेच अनुषांगिक, मदतीसाठीची बोट सामुग्री पोहचविण्यात येत आहे.
मुखेड तालुक्यातील कुंद्राळा तलावाच्या पाण्याच्या अडकलेल्या मारूती सोनपल्ले या तरूणाची सुटका करण्यात यश आले आहे. उपविभागीय अधिकारी व्ही. एल. कोळी तसेच स्थानिक मदत पथक यांनी या तरुणाच्या सुटकेसाठी प्रयत्न केले.
दरम्यान,  लिंबोटी धरणाचे दरवाजे हळू-हळू बंद होऊ लागल्याने, मन्याडचे पाणी ओसरू लागले आहे. तरीही नदीकाठच्या रहिवाश्यानी सतर्कता बाळगावी, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आपत्कालिन परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयातून विविध पातळ्यावंरील माहितीची देवाण-घेवाण, संपर्क-समन्वय यासाठी कार्यरत आहेत.

 00000

No comments:

Post a Comment

  वृत्‍त क्र.   36 6 एमएच-सीईटी परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   नांदेड , दि.   19   : - एमएच-सीईटी परीक्षा-2024     ही 2...