Saturday, October 1, 2016

जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत यंत्रणा सज्ज
नागरिकांनी घाबरून न जाता, सतर्कता बाळगण्याचे आवाहन
           नांदेड, दि. 1 :-  नांदेड जिल्ह्यात अचानक उद्भवलेल्या पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत यंत्रणांना सतर्क करण्यात आले असून कोणत्याही परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले आहे. डोंगरगाव येथील परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे.
लिंबोटीसह जिल्ह्यातील सर्व धरण, प्रकल्प सुरक्षीत असून नागरिकांनी अफवावर विश्वास ठेऊ नये, असेही आवाहनही जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.   लिंबोटी धरणाचे सर्व दरवाजे खुले झाल्याने लोहा तालुक्यातील डोंगरगाव गावातील 23 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले. त्यांच्या सुखरूप सुटकेसाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून, बिदर येथून आलेल्या हवाई दलाच्या हेलीकॅाप्टरने या तेवीस जणाच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
दरम्यान, संभाव्य परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला (एनडीआरएफ) दलाला पाचारण करण्यात आले आहे.  हे दल रात्रीपर्यंत जिल्ह्यात पोहचणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. जोरदार पावसामुळे उद्भवलेल्या या परिस्थितीवर जिल्हाधिकारी सुरेश काकाणी स्वतः नजर ठेवून आहेत. त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत विविध यंत्रणाचे तातडीने समन्वय सुरु केले आहे. मुखेड येथे कुंद्राळा तलावाच्या पाण्यामुळे तयार झालेल्या बेटावर एक मुलगाही अडकला आहे. त्याच्या सुटकेसाठीही सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने लिंबोटी धरणाचे चौदा दरवाजे खुले झाले आहेत. बारुळ प्रकल्पातूनही पाणी बाहेर पडले आहे. तर विष्णपुरी प्रकल्पातून दोन दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी. सखल परिसरातील नागरिकांनी दक्ष राहवे असेही आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाच्यावतीने करण्यात आले आहे. 

 00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...