Saturday, October 1, 2016

 विक्रीकराच्या महसुलातून विकासात्मक
कामात मोठे योगदान – खासदार चव्हाण
विक्रीकर दिन कार्यक्रमात जागरूक करदाते , कार्यक्षम अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार

नांदेड दि. 1 :- विक्रीकर  विभागाची  कार्यक्षमता , हीच राज्याचीही कार्यक्षमता मानली जाते. त्यामुळे या कराच्या महसुलातून राज्याच्या विकासात्मक कामात मोठे योगदान दिले जाते , असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज येथे केले. विक्रीकर विभागाच्या नांदेड सह आयुक्त कार्यालयाच्यावतीने  विक्रीकर  दिनाच्या  निमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. चव्हाण अध्यक्षस्थानावरून बोलत होते.  
जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात नांदेड विभागातील जागरूक करदाते तसेच करसंकलनात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही  सत्कार करण्यात आला. यावेळी विक्रीकर दिनानिमित्त मुंबईत आयोजित विक्रीकर दिनाच्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या भाषणाचेही थेट प्रक्षेपण यावेळी सभागृहात करण्यात आले.
व्यासपीठावर  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगलताई गुंडले, सर्वश्री आमदार अमर राजूकर, डी. पी. सावंत, वसंत चव्हाण, सुभाष साबणे, हेमंत पाटील यांच्यासह सह विक्रीकर आयुक्त एन. एम. कोकणे आदींचीही प्रमुख उपस्थिती होती.
खासदार चव्हाण पुढे म्हणाले की , राज्याच्या महसुलात विक्रीकराचा मोठा वाटा आहे. या करातून राज्यातील विकासात्मक कामांमध्ये योगदान दिले जाते. त्यामुळे विक्रीकर विभागाची कार्यक्षमता हीच राज्याची कार्यक्षमता समजली जाते. करप्रणालीतील सुटसूटीतपणा आणि सुकरता यामुळे करदात्यांनाही प्रोत्साहन मिळत असते. त्यामुळे उद्योग-व्यवसाय-व्यापार यांच्या वाढीसाठी कर प्रणालीतील सुविधाही महत्त्वाची आहे. ई-फायलींग, ॲप तसेच माहिती तंत्रज्ज्ञानाच्या वापरामुळे कर प्रणाली सोपी झाली आहे. त्यामुळेही करदात्यांची संख्या वाढली आहे. कर देण्याबाबतही जागरुकता वाढली आहे. कर हे ओझे न वाटता, कर देण्यासाठी करदात्यांना प्रोत्साहीत करणाऱ्या योजना राबविता येतील. विभागातील नांदेड, लातूरसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात उद्योग-व्यापार यांच्या वाढीसाठी प्रयत्न व्हावेत, जेणेकरून विक्रीकरात आणखी भरच पडेल, अशी अपेक्षाही श्री. चव्हाण यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकात नांदेड विभागाचे विक्रीकर सहआयुक्त श्री. कोकणे यांनी नांदेडसह, लातूर, परभणी आणि  हिंगोली  जिल्ह्यातून  गत आर्थिक वर्षात 452 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता, तर या आर्थिक वर्षातील गत पाच महिन्यात उद्दीष्टपुर्तीहून अधीक 237.4 कोटी रुपयांचा महसूल एकत्रित करण्याची विभागाने कामगिरी केल्याची माहिती दिली.
सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले. तसेच तत्पर आणि जागरूक करदाते म्हणून उद्योजक-व्यावसायिकांचाही सत्कार करण्यात आला. त्यामध्ये बाफना मोटर्स-संचालक प्रभाकर विश्र्वास, साई स्मरण फुडस लिमीटेड –नरेश गोयंका, शिवा ग्लोबल इंडस्ट्रीज- दिपक मालीवाल, गजानन स्पेअर हब- सतिश पाटील, एल.बी. कॅाटन इंडस्ट्रीज धर्माबाद - धर्मेंद्र पांडे (आदित्य पल्लोड), राजयोग ॲटो प्रा.लि.लातूर-योगीराज जाधव, अरिहंत फायबर्स परभणी- अजय सरीया, मारूती ॲटो हिंगोली – नरेश देशमुख यांचा समावेश होता. तर कर संकलनात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. यामध्ये श्रीमती शोभाबाई मिरासे (सेविका), भारत बुरकूले (लिपीक), विक्रीकर निरीक्षक-संजय अडकिणे व सुधाकर वसावे, विक्रीकर अधिकारी प्रकाश गोपनर, सहायक विक्रीकर आयुक्त रविंद्र जोगदंड, उपायुक्त श्रीमती रंजना देशमुख यांचा समावेश होता. याशिवाय उल्लेखनीय कामगिरीसाठी उपायुक्त दिपक वाघमारे, विक्रीकर अधिकारी माधव पुरी, नंदकिशोर लुल्ले, कर निरीक्षक मनोज गजभारे, सेवक पाशा मोईनुद्दीन बेग यांचाही सत्कार करण्यात आला.
सुरवातीला  मीना  सोलापूरे यांनी स्वागत गीत सादर केले. सहायक आयुक्त पंडित जाधव, मदन दराडे यांनी संयोजन केले. सहायक आयुक्त श्री. जोगदंड, विक्रीकर अधिकारी आनंद मुधोळकर, निरीक्षक अंजली दासरे यांनी सुत्रसंचलन केले, उपायुक्त श्रीमती देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमास व्यापारी, उद्योजक यांच्यासह सनदी-लेखापाल, कर-सल्लागार विविध विभागांचे अधिकारी,कर्मचारी आदींचीही उपस्थिती होती.
0000000

No comments:

Post a Comment

 शासकीय लेखनसामुग्री व ग्रंथागार 22 ते 26 एप्रिल या कालावधीत बंद छत्रपती संभाजीनगर, दि. 18 (विमाका): शासकीय लेखनसामुग्री व ग्रंथागार, छत्रपत...