Saturday, September 3, 2016

सरकारच्या उपक्रमांच्या यशस्वीतेत
लोकसहभागाचे योगदान मोलाचे - सार्वजनिक बांधकाम मंत्री शिंदे
मरडगातील गटारमुक्तीचे कौतूक, तळणीत डिजीटल क्लासरुमचे उद्घाटन

नांदेड, दि. 3 :-  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी मरडगा येथील गटारमुक्त, डासमुक्त आणि टँकरमुक्त उपक्रमातील लोकसहभागाबाबत कौतुकोद्गार काढले. राज्य सरकारच्या उपक्रमात लोकसहभाग असेल, तर परिसराचा कायापालट होऊ शकतो, त्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा ठरतो, असे श्री. शिंदे म्हणाले. श्री. शिंदे यांच्यासोबत आमदार नागेश पाटील-आष्टीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे, शिवसेनेचे पदाधिकारी भुजंग पाटील, मिलिंद देशमुख आदींचीही उपस्थिती होती.
श्री. शिंदे दोन दिवसांच्या नांदेड दौऱ्यावर आहेत. त्यामध्ये त्यांनी आज हदगाव तालुक्यातील मडरगा येथील शोषखड्ड्याच्या उपक्रमशीलतेची पाहणी केली. तसेच गटारमुक्तीमुळे डासमुक्त वातावरण निर्माण केल्याबद्दल नागरिकांचे कौतूक केले. यावेळी श्री. शिंदे यांच्या हस्ते मरडगा ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचेही उद्घाटन संपन्न झाले. तसेच जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील डिजिटल क्लासरुमचेही उद्घाटनही श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. मडरगा येथील नागरिकांशीही त्यांनी संवाद साधताना त्यांनी लोकवर्गणीतून डिजीटल शाळा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल तसेच हदगाव तालुक्यात 120 तर हिमायतनगर तालुक्यामध्ये 40 शाळांमध्ये डिजिटल शाळा उपक्रम यशस्वी केल्याबद्दलही कौतुकोद्गार काढले. परिसरातील जलयुक्त शिवार कामांबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांचेही भाषण झाले. यावेळी मरडगाचे सरपंच बाबुराव काळे, ग्रामपंचायत सदस्य आदींचीही उपस्थिती होती.
या दौऱ्यात श्री. शिंदे यांनी तळणी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील डिजीटल क्लासरूम्सचे उद्गाटनही केले. तत्पुर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनही केले. तळणी येथील नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती, पुलांचे बांधकाम तसेच साखळी बंधारे यांचे बांधकाम याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येतील , व त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्धतेबाबत प्रयत्न केले जातील, असेही सांगितले.
त्यांनतर धानोरा ग्रामपंचायतीमधील कयाधू जलशुद्धीकरण यंत्रणेचेही मंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते उद्गाटन करण्यात आले. मडरगा, तळणी आणि धानारो येथील कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

000000

No comments:

Post a Comment