Tuesday, August 16, 2016

मानवी अवयवदान जनजागृती मोहिमेत
नांदेड जिल्ह्यात विविध उपक्रमांचे नियोजन
संमती पत्र नोंदणीस गुरुवारपासून सुरवात

नांदेड, दि. 16 :- राज्यातील आरोग्य विभागाच्यावतीने 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत मानवी अवयवदान व प्रत्योरापण विषयाबाबत व्यापक अशी जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगे नांदेड जिल्ह्यात या मोहिमेला जोडूनच गुरुवार 18 ऑगस्ट,2016 पासून मानवी अवयवदान संमत्री पत्र नोंदणीस सुरवात करण्यात येणार आहे. या जनजागृती मोहिमेत जिल्ह्यात निबंध, वक्तृत्त्व, रांगोळी अशा स्पर्धा आणि जनजागरण  फेरी असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
मोहिमेच्या  नियोजनासाठी  डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॅा. कानन येळीकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाची बैठक आज गुरुगोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालयात संपन्न झाली. बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॅा. विजय कंदेवाड, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॅा. भास्कर श्यामकुंवर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॅा. एस. एच. गुंटूरकर, डॅा. उत्तम इंगळे यांच्यासह विविध वैद्यकीय संघटनांचे पदाधिकारी, महाविद्यालयांचे प्राचार्य, स्वयंसेवी संस्था आदींचे प्रतिनीधींची उपस्थिती होती.
मोहिमेत गुरुवारपासून श्री. गुरुगोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-विष्णुपूरी या तीन ठिकाणी शनिवार 27 ऑगस्ट पर्यंत मानवी अवयवदान संमती पत्र भरून घेण्यात येणार आहेत. मंगळवार 30 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता महात्मा ज्योतिबा फुले परिसर, आयटीआय चौक येथून भव्य जनजागरण फेरी काढण्यात येणार आहेत. महात्मा गांधी पुतळा येथे या फेरीचा समारोप होईल. या फेरीत राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना तसेच विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, नर्सीग महाविद्यालय, वैद्यकीय व्यावसायिकांच्या विविध संघटनाचे सदस्य, स्वयंसेवी संस्था आदींचे सदस्य सहभागी होणार आहेत. बुधवार 31 ऑगस्ट रोजी विविध महाविद्यालयांच्या समन्वयातून निबंध, रांगोळी आणि वक्तृत्त्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. गुरुवार  1 सप्टेंबर रोजी या जनजागृती अभियानाचा जिल्हास्तरीय समारोप होणार आहे. यादिवशीही रक्तदान शिबीर, अवयदान नोंदणी शिबीर, तसेच जनजागृती मोहिमेतील विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण, संमती पत्र नोंदणीत सर्वाधिक नोंदणी गौरव असा कार्यक्रम होणार आहे.
बैठकीत मोहिमेतील या विविध कार्यक्रमांचे नियोजन तसेच त्याच्या आयोजनाची  जबाबदारी  याबाबत डॅा. येळीकर यांनी सूचनाही केल्या. मानवी अवयदान नोंदणीसाठी जिल्ह्यातील विविध घटक, नागरिकांनी प्रतिसाद देऊन जिल्ह्याची ही मोहिम यशस्वी करावी, असे आवाहनही डॅा. येळीकर यांनी केले.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   389   लोकसभा निवडणुकीसाठी आज नांदेड जिल् ‍ ह्यात मतदान   प्रशासन सज् ‍ ज ; मोठ्या संख् ‍ येने मतदान करण् ‍ याचे ...