Thursday, July 27, 2017

कर्करोग सप्ताह निमित्त
तपासणी शिबिराचे आयोजन
नांदेड, दि. 27 :- जागतिक मौखिक, डोके, मान व चेहरा कर्करोग सप्ताह निमित्त श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात कान, नाक, घसा व मौखिक कर्करोग मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात गरजू रुग्णांनी तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांनी केले आहे.      
राष्ट्रीय तंबाखू  नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक मौखिक, डोके, मान व चेहरा कर्करोग दिन व सप्ताह 27 जुलै ते 5 ऑगस्ट 2017 पर्यंत जिल्हा रुग्णालयात साजरा करण्यात येणार आहे. रुग्णालयातील रुग्ण व त्यांचनातेवाईकांना कर्करोगाविषयी तज्ज्ञांमार्फत आज मार्गदर्शन करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर यांनी तंबाखु सेवनामुळे कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक होते. समाजा तंबाखु दुष्परिणामाची जनजागृती होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
000000


एसटीच्या सहाय्यक (कनिष्ठ) पदासाठी
परभणी केंद्रातील परीक्षार्थींची रविवारी फेर लेखी परीक्षा
नांदेड, दि. 27 :- राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सहाय्यक (कनिष्ठ) या पदासाठी परभणी व नागपूर शहरातील काही परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्याने या केंद्रावरील परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परभणी परीक्षा केंद्रातील 2 हजार 44 परीक्षार्थीपैकी 1 हजार 94 परीक्षार्थींची फेर लेखी परीक्षा रविवार 30 जुलै 2017 रोजी ग्रामीण पॉलिटेक्नीकल विद्यालय, विष्णुपुरी, नांदेड येथे घेण्यात येणार आहे. संबंधीत उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन  विभाग नियंत्रक, राज्य परिवहन, नांदेड यांनी केले आहे.    
परिवहन महामंडळातील सहाय्यक (कनिष्ठ) या पदासाठी राज्यात विविध ठिकाणी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानुसार नांदेड विभागात सहाय्यक (क) या पदासाठी रविवार 9 जुलै रोजी घेण्यात आलेली परीक्षा सुरळीतपणे पार पडली असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.  

000000
नांदेड जिल्हा परिषदेची
5 ऑगस्ट रोजी सर्वसाधारण सभा
नांदेड दि. 27 :- जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शनिवार 5 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी 1 वा. कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे विषय सुचीनुसार आयोजित केली आहे, असे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) यांनी कळविले आहे.
0000000
मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू
नांदेड दि. 27 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना प, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा गुरुवार 27 जुलै 2017 च्या 6 वाजेपासून ते शनिवार 26 ऑगस्ट 2017 रोजी मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.
0000000


Wednesday, July 26, 2017

शेतकरी पीक कर्ज माफीचे
ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात
नांदेड दि. 26 :- राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 या पीक कर्ज माफी योजनेतंर्गत राज्य शासनाच्या आपले सरकार https://aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर त्याचबरोबर https://www.csmssy.in या पोर्टलवर अर्ज उपलब्ध करुन दिला आहे. अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, कर्ज खाते उतारा, बँक पासबुक व आधार कार्ड लिंक केलेला मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. या कागदपत्रासह जिल्ह्यातील कोणत्याही "आपले सरकार सेवा केंद्रामधुन" अर्ज भरता येईल, अशी माहिती उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी दिली आहे.    
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया नांदेड तालुक्यातील बाभुळगाव येथुन सुरु करण्यात आली आहे. या पीक कर्ज माफीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुना सर्व बँक शाखांमध्ये, ग्रामपंचायत कार्यालयात व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या गटसचिव यांचेकडे उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी कर्ज माफीचे अर्ज ऑनलाईन भरत असताना किंवा कर्ज वाटपासंबंधाने काही अडचण असल्यास दर सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत तहसिल कार्यालय येथे तालुकास्तरीय समन्वय समितीकडे संपर्क करावा, असे आवाहन तहसिलदार किरण अंबेकर यांनी केले. पीक कर्ज माफी व ऑनलाईन अर्ज भरणे संबंधी उपनिबंधक पी. ए. साठे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी वि. का. सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष पी. एम. मोरे, सचिव एन. सी. कोटुरवार, संस्थेचे लाभधारक शेतकरी, महा ई सेवा केंद्राचे संचालक श्री. आसोरे उपस्थित होते.

0000000
शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे ;
अर्ज करण्यास 31 ऑगस्ट पर्यंत मुदत  
नांदेड दि. 26 :-  शेतकऱ्यांना विविध देशातील तंत्रज्ञान कळावे या उद्देशाने देशाबाहेरील अभ्यास दौरा होणार असून यासाठी इच्छूक शेतकऱ्यांनी गुरुवार 31 ऑगस्ट 2017 पर्यंत तालुका कृषि अधिकारी यांचेकडे अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
कृषि विभागाच्यावतीने सन 2017-18 या वर्षासाठी इस्त्राईल, जर्मनी / नेदरलँड आणि ऑस्ट्रोलिया या प्रमाणे अभ्यास दौऱ्यांचे नियोजन आहे. या दौऱ्यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीतजास्त एक लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान शासनाकडून दिले जाणार आहे. या दौऱ्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे पासपोर्ट, विमा पॉलिसी, स्वत:चे नाव असलेला सात-बारा व नमुना आठ अ असणे आवश्यक आहे. प्रस्ताव सादरकर्ता अर्जदार 25 ते 60 वर्षे वयोगटातील शेतकरी असावा. त्यांचे उत्पन्नाचे मुख्य साधन हे शेती असावे. तसेच शासकीय, निमशासकीय, सहकारी संस्थेत नोकरीस, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए, अभियंता, कंत्राटदार आदी व्यवसायीक नसावा. 
शेतकऱ्यांनी विहित प्रपत्रातील परिपुर्ण प्रस्ताव तालुका कृषि अधिकारी यांचेकडे सादर करावा. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शुल्कामुळे
प्रवेश, परीक्षेपासून वंचित ठेवू नये
नांदेड, दि. 26 :- भारत सरकार शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 2016-17 मधील शिक्षण इतर शुल्काची रक्कम महाविद्यालयास मिळाली नाही त्या विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयाची शुल्क संगणक प्रणाली सुरु झाल्यावर बँक खात्यावर जमा होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा व प्रवेशापास वंचित ठेवू नाही. जे विद्यार्थी परीक्षा पात्र झाले आहेत त्यांचे गुणपत्रक, शाळा सोडण्याचा दाखला, तत्सम दस्तऐवज अडवू नाही. विद्यार्थ्यांना तत्सम दस्तऐवज देण्यास नकार दिल्यास संबंधित महाविद्यालयाविरुद्ध कार्यवाही केली जाईल, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.  
            शैक्षणिक वर्ष 2016-17 मधील नांदेड जिल्हयातील 45 हजार 720 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिष्यवृत्ती, फ्रिशीप अर्ज भरले होते. त्यापैकी 38 हजार 133 विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज मंजूर करण्यात आल आहेत. शैक्षणिक वर्ष 2016-17 मधील 7 हजार 410 विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित आहेत. सद्यस्थितीत संगणक प्रणाली मास्टेक या कंपनीचा करार संपल्यामुळे भारत सरकार शिष्यवृत्तीचे संकेतस्थळ बंद आहे. शासनाकडून आय.ट.(I.T.) विभागामार्फत Unitied portal विकसित होत आहे. या DBT Portal ( Direct benefiet Transfer) द्वारेच ई-स्कॉलरशिप योजना राबविण्यात येणार आहे.
भारत सरकार शिष्यवृत्ती शिक्षण फी परीक्षा फी योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2011-12 पास सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत ई-स्कॉलरश प्रणालीची सुरूवात करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन कनिष्ठ, वरिष्ठ, पदवी, पदव्युत्तर त्यादी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित,व्यावसायिक, बिगरव्यावसायिक महाविद्यालयातील अनु.जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याना निर्वाह भत्ताची रक्कम थेट बँक खात्यावर जमा करण्यात येते. तसेच संबंधित महाविद्यालयाची शिक्षण फी इतर फीची रक्कम महाविद्यालयाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते.

000000